WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

मंदिर परिसरातही तरुणाईची ‘सैराट’गिरी


मंदिर परिसरातही तरुणाईची ‘सैराट‘गिरी

बोलक्या फलकाने भरकटलेल्या तरुणांचे कान टोचले

चिपळूण : शहरातील गांधीघाट, श्रीक्षेत्र गांधारेश्वर येथील शांत, निसर्गरम्य आणि पवित्र परिसरात एका झाडावर लावण्यात आलेला फलक सध्या अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.“तुम्ही सुशिक्षित आहात का ? मंदिर एक पवित्र जागा आहे. तुमचे किसिंग करण्याची जागा नाही, याचे भान राहू दे” अशा आशयाचा हा फलक केवळ सूचना नसून, ‘सैराट’ झालेल्या तरुणांच्या वागण्यावर उपरोधिक चपराक असल्याची चर्चा परिसरात रंगली आहे.

वाशिष्ठी नदीच्या शांत काठावर वसलेले श्री क्षेत्र गांधारेश्वर मंदिराबरोबरच गांधीघाट हे केवळ पर्यटनस्थळ नाही, तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या रक्षाकलश समाधीमुळे ऐतिहासिक आणि भावनिक महत्त्व लाभलेले ठिकाण आहे. परिसरात गांधारेश्वर मंदिरासह इतर मंदिरे, हिरवाईने नटलेले उद्यान आणि उंच झाडांची दाट सावली असल्याने येथे नेहमीच शांतता आणि प्रसन्नता अनुभवायला मिळते. मात्र अलीकडच्या काळात काही तरुण-तरुणींकडून या परिसराचा “रोमँटिक स्पॉट” म्हणून वापर होत असल्याचा संताप स्थानिकांमध्ये व्यक्त होत आहे. धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या ठिकाणी ‘प्रेमप्रदर्शन’ वाढू लागल्याने अखेर कुणीतरी हा बोलका फलक झाडावर लावून आपली खंत व्यक्त केली.

स्थानिकांच्या मते, “प्रेम करायला विरोध नाही; पण जागेचं भान ठेवणं गरजेचं आहे. श्री क्षेत्र गांधारेश्वर, गांधीघाट हा धार्मिक, संस्कार, शांतता आणि आदर जपणारा परिसर आहे; इथे ‘रिल्स’पेक्षा मूल्यांना महत्त्व दिलं पाहिजे.”

विशेष म्हणजे, चिपळूण शहराला वालोपे येथील रेल्वे स्थानकाशी जोडणाऱ्या वाशिष्ठी नदीवरील पुलामुळे या परिसरात पर्यटकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे परिसराची स्वच्छता, पावित्र्य आणि शांतता राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी असल्याचेही नागरिकांनी नमूद केले.


595
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!