सावर्डेतील अपघातानंतर प्रशासनाची धाव
रंबलर, गतिरोधक आणि खड्डे दुरुस्तीचे काम लवकरच सुरू
सावर्डे (विनायक सावंत) : चिपळूण तालुक्यातील मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील महत्त्वाचे ठिकाण असलेल्या सावर्डे येथे झालेल्या गंभीर अपघातानंतर परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेबाबत संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते केतन पवार आणि ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर संबंधित प्रशासनाने तातडीने सावर्डे येथे भेट देत परिस्थितीची पाहणी केली.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अपघातांसह डेरवण मुख्य रस्त्यावर सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या वालावलकर रुग्णालयाकडे येणाऱ्या रुग्णवाहिका, रुग्ण, रुग्णालयातील कर्मचारी, मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी तसेच इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील नर्सरीपासूनच्या विद्यार्थ्यांना या खराब रस्त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या मार्गावरील पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावर वाहतुकीची वर्दळही मोठ्या प्रमाणात असल्याने विद्यार्थी आणि ग्रामस्थांच्या सुरक्षेच्या दृष्टीने काही ठिकाणी गतिरोधक उभारण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात आली होती.
या सर्व समस्यांबाबत आमदार शेखर निकम यांच्या समवेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यानंतर महामार्गावर आवश्यक त्या ठिकाणी रंबलर स्ट्रिप्स बसविणे, डेरवण मुख्य रस्त्यावर गतिरोधक उभारणे तसेच रस्त्यावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे काम लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या पाहणीदरम्यान पंचायत समिती सदस्य शौकत माखजनकर, शरद शिगवण, उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते केतन पवार, सांस्कृतिक जिल्हाध्यक्ष देवराज गरगटे, सतीश जाधव, संतोष कदम यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांतील अपघातांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने सावर्डे व डेरवण परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, कामे वेळेत पूर्ण करून रस्ता सुरक्षित करण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.











