WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

“अपघाताला वर्ष उलटलं… पण प्रशासन अजून झोपेत!”


“अपघाताला वर्ष उलटलं… पण प्रशासन अजून झोपेत!”

सावर्डे बस थांबा उद्ध्वस्तच; प्रवाशांचा संताप

प्रशासनाविरोधात तीव्र रोष

🔺विनायक सावंत🔺

सावर्डे : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील (NH-66) सावर्डे येथील मुख्य बस थांबा (पिकअप शेड) गेल्या तब्बल एका वर्षापासून उद्ध्वस्त अवस्थेत पडून असून संबंधित यंत्रणांच्या हलगर्जीपणामुळे प्रवाशांचा संयम आता संपत आला आहे. दररोज शेकडो प्रवासी जीव मुठीत धरून या धोकादायक बसथांब्यावर उभे राहत असून प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात स्थानिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

सुमारे वर्षभरापूर्वी मुंबईकडून येणाऱ्या भरधाव लक्झरी बसने नियंत्रण गमावून विभाजक ओलांडत विरुद्ध दिशेच्या रस्त्यावर असलेल्या सावर्डे बस थांब्याला जोरदार धडक दिली होती. या भीषण अपघातात बस थांब्याचे पिकअप शेड पूर्णपणे वाकले, पत्रे फाटली आणि शेजारील स्ट्रीट लाईटचा विद्युत खांबही कोसळला. सुदैवाने पहाटेची वेळ असल्याने त्या वेळी थांब्यावर प्रवासी नसल्यामुळे मोठी जीवितहानी टळली. मात्र या घटनेला वर्षभर उलटूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अथवा संबंधित विभागाने बस थांब्याची दुरुस्ती करण्याची तसदी घेतलेली नाही. परिणामी उद्ध्वस्त अवस्थेतील हा बस थांबा आजही प्रवाशांच्या सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण करत आहे.

सध्या बस थांब्याचे लोखंडी खांब गंजून वाकले आहेत, मागील पत्रा पूर्णपणे फाटला आहे, बसण्यासाठीचे बाक मोडकळीस आले असून संपूर्ण परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. अपघातात पडलेल्या स्ट्रीट लाईटच्या खांबाचा केवळ चौथरा उरला असून लोखंडी सळ्या उघड्यावर असल्याने रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता अधिक वाढली आहे. पावसापासून बचाव करण्यासाठी स्थानिकांनी प्लास्टिकचे कागद आणि फाटके कपडे बांधून तात्पुरते आच्छादन तयार केले आहे. ही परिस्थिती प्रशासनाच्या उदासीनतेचे जिवंत उदाहरण असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत.

सावर्डे हा चिपळूण तालुक्यातील अत्यंत महत्त्वाचा बसथांबा असून येथून मुंबई, पुणे, रत्नागिरीसह विविध ठिकाणी जाणाऱ्या एसटी व खाजगी बसेस थांबतात. दररोज शेकडो प्रवासी, शाळकरी विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना या मोडकळीस आलेल्या थांब्यावर ताटकळत उभे राहावे लागते. विशेषतः पावसाळ्यात प्रवाशांचे अक्षरशः हाल होत असून महिलांमध्ये रात्रीच्या वेळी असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

“अपघाताला वर्ष झाले, अनेकदा तक्रारी केल्या; मात्र प्रशासनाला जागच आलेली नाही. नवीन बसथांबा आणि स्ट्रीट लाईट उभारण्यासाठी आणखी किती दिवस वाट पाहायची?” असा संतप्त सवाल स्थानिक प्रवासी आणि ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.

प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने हस्तक्षेप करून सावर्डे येथे नवीन, सुरक्षित आणि सुसज्ज बसथांबा तसेच स्ट्रीट लाईटची व्यवस्था करावी, अशी जोरदार मागणी आता स्थानिक नागरिकांकडून होत आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!