WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

येलोंदेवाडी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांची रविवारी निर्णायक बैठक


येलोंदेवाडी धरणग्रस्तांच्या प्रश्नांवर पालकमंत्र्यांची रविवारी निर्णायक बैठक

शिरवली व देवखेरकी येथील बांधकाम संपादनासह विविध विषयांवर चर्चा

चिपळूण: चिपळूण तालुक्यातील येलोंदेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प अंतर्गत धरणाच्या बुडीक्षेत्राबाहेरील शिरवली व देवखेरकी येथील बांधकामांच्या संपादनाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी २६ जुलै रोजी दुपारी १ वाजता पालकमंत्री उदयजी सामंत यांच्या उपस्थितीत पाली येथे महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत प्रकल्पग्रस्तांचे प्रलंबित प्रश्न, विविध अडचणी आणि संपादन प्रक्रियेसंदर्भातील मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे.
येलोंदेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पामुळे प्रभावित झालेल्या शिरवली व देवखेरकी गावांतील धरणाच्या बुडीक्षेत्राबाहेरील बांधकामांच्या संपादनाचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजीचे वातावरण असून, शासन स्तरावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी सातत्याने होत आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद सदस्या शिवानी सावंत आणि संदीप सावंत यांनी पालकमंत्री उदयजी सामंत यांची भेट घेऊन प्रकल्पग्रस्त, लोकप्रतिनिधी आणि संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आयोजित करण्याची विनंती केली होती. त्यांच्या मागणीची दखल घेत पालकमंत्री सामंत यांनी संबंधित विभागाला बैठकीचे निर्देश दिले असून, त्यानुसार २६ जुलै रोजी ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीस जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता तसेच संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहणार आहेत. प्रकल्पग्रस्तांच्या समस्या, बांधकाम संपादन प्रक्रिया, नुकसानभरपाईसंदर्भातील मुद्दे आणि इतर प्रलंबित प्रश्नांवर यावेळी सविस्तर चर्चा करून पुढील कार्यवाहीबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
या बैठकीकडे येलोंदेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पग्रस्तांसह शिरवली व देवखेरकी परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले असून, अनेक वर्षांपासून रखडलेल्या प्रश्नांवर ठोस निर्णय होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!