WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

गुणवत्ता मुल्यमापनात गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी ची राष्ट्रीय स्तरावर झेप


                              गुणवत्ता मुल्यमापनात गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी ची राष्ट्रीय स्तरावर झेप

देशभरातील ३९८ फार्मसी महाविद्यालयातून ७३ वा क्रमांक

चिपळूण ः तालुक्यातील सावर्डे येथील गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी महाविद्यालयाने शैक्षणिक गुणवत्तेच्या क्षेत्रात आणखी एक मानाचा टप्पा गाठला आहे. फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या पुढाकाराने आणि क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया यांच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या गुणवत्ता मूल्यमापन प्रक्रियेत सहभागी झालेल्या देशातील ३९८ फार्मसी महाविद्यालयांमधून गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसीने ७३ वा क्रमांक मिळवून राष्ट्रीय स्तरावर गुणवत्तेची प्रभावी छाप पाडली आहे.
ही गुणवत्ता तपासणी अध्यापनाची गुणवत्ता, प्राध्यापकांची पात्रता, आधुनिक प्रयोगशाळा, संशोधन व नवोपक्रम, ग्रंथालय, विद्यार्थी विकास, उद्योगाभिमुख शिक्षण, गुणवत्ता हमी प्रणाली, संस्थात्मक व्यवस्थापन, पायाभूत सुविधा तसेच शैक्षणिक परिणाम अशा विविध निकषांच्या आधारे करण्यात आली. या सर्व बाबींमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत महाविद्यालयाने राष्ट्रीय स्तरावरील मानाचे स्थान मिळविले.
या गुणवत्ता मूल्यमापनासाठी आवश्यक असलेले दस्तऐवजीकरण, विविध विभागांकडील माहितीचे संकलन, गुणवत्ता निकषांनुसार अहवाल तयार करणे, माहितीची पडताळणी तसेच संपूर्ण प्रक्रियेचा समन्वय अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आला. महाविद्यालयाच्या या यशामुळे विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी आणि परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. आगामी काळात संशोधन, नवोपक्रम, उद्योगाभिमुख शिक्षण आणि गुणवत्तापूर्ण अध्यापनाच्या बळावर महाविद्यालय आणखी मोठी भरारी घेईल, असा विश्वास महाविद्यालय व्यवस्थापनाने व्यक्त केला.
महाविद्यालयाने स्थापनेपासून गुणवत्तापूर्ण फार्मसी शिक्षण, आधुनिक अध्यापन पद्धती, उद्योग-संस्था सहकार्य, संशोधन संस्कृती, कौशल्य विकास आणि समाजाभिमुख उपक्रम यांना सातत्याने प्राधान्य दिले आहे. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचेच हे राष्ट्रीय स्तरावरील यश असल्याचे महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. या यशाबद्दल आमदार शेखर निकम, संस्थेचे कार्याध्यक्ष अनिरुद्ध निकम, उपाध्यक्ष प्रशांत निकम सेक्रेटरी महेश महाडिक यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य, सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन आणि विद्यार्थीकेंद्रित उपक्रमांच्या माध्यमातून महाविद्यालयाने राष्ट्रीय स्तरावर आपले वेगळेपण सिद्ध केले असून भविष्यातही अशीच उत्कृष्ट परंपरा कायम ठेवावी, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!