चाळीसहून अधिक गावांचा ९ तास वीजपुरवठा राहणार बंद
सावर्डे : सोमवार दिनांक ११ मे २०२६ रोजी ११०/३३ केवी आरवली ईएचव्ही उपकेंद्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे व तातडीचे देखभाल तसेच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने महावितरणच्या सावर्डे उपविभागांतर्गत येणाऱ्या चाळीसहून अधिक गावांचा वीजपुरवठा तब्बल ९ तास बंद राहणार आहे.
महावितरणकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत वीजपुरवठा खंडित राहणार असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
यामध्ये सावर्डे, दहिवली, दुर्गेवाडी, डेरवण, कुडप, कामथे, कोसबी, मुंडे, मंजूत्री, आगवे, टेरव, हडकणी, फुरूस, काजारकोंड, कोंडमळा, खेरशेत, खरवते, ताम्हनमाळा, नारदखेरकी, ओमळी, तुरंबव, नायशी, पालवण, मांडकी, नांदगाव, येगाव, असुर्डे, मूर्तवडे, तोंडली पिलवली, पातेपिलवली, वीर, आबिटगाव, शिरंबे, गुळवणे, ढाकमोळी, ढोक्रोळी, वहाळ, कोकरे, कुटरे, पाते तसेच आसपासच्या परिसरातील गावांचा समावेश आहे.
महत्त्वाच्या दुरुस्तीच्या कामामुळे हा नियोजित वीजबंद ठेवण्यात येत असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. तसेच वीज ग्राहकांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल महावितरण सावर्डे उपविभागाने दिलगिरी व्यक्त केली आहे.











