सावर्डे जि. प. गटात ‘दोन माजी सभापती आमने-सामने’
चिपळूण तालुक्याचे लक्ष केंद्रित
चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चिपळूण तालुक्यातील सावर्डे जिल्हा परिषद गटात अटीतटीची आणि लक्षवेधी लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ठाकरे गटाच्या माजी सभापती सौ. धनश्री शिंदे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत सावर्डे गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांच्या पत्नी व माजी सभापती सौ. पूजा निकम यांनीही याच गटातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी अर्ज भरल्याने दोन माजी सभापती आमने-सामने आल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी पहिल्या दोन दिवसांत एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नव्हता. मात्र सोमवारपासून इच्छुक उमेदवारांची उमेदवारी दाखल करण्यासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने ‘एकला चलो’ची भूमिका घेत सर्व सहा उमेदवार मैदानात उतरवले आहेत. तर शिवसेना-भाजप युतीने एकत्रितपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. युतीमध्ये जिल्हा परिषदेच्या ९ पैकी ३ आणि पंचायत समितीच्या १८ पैकी ७ जागा भाजपच्या वाट्याला गेल्या आहेत.
दुसरीकडे ठाकरे सेनेने काही ठिकाणी काँग्रेस तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत आघाडी केली आहे. या राजकीय घडामोडींना वेग आला असतानाच ठाकरे सेनेच्या माजी सभापती सौ. धनश्री शिंदे यांनी शिंदे गटात प्रवेश करून राजकीय समीकरणे बदलली आहेत. त्यांनी यापूर्वी अलोरे जिल्हा परिषद गटातून तयारी केली होती. मात्र हा गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राखीव झाल्याने त्यांनी सावर्डे जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
दरम्यान, माजी सभापती सौ. पूजा निकम यांनी मंगळवारी सावर्डे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी अर्ज दाखल केला. या गटात त्यांचा सातत्याने जनसंपर्क राहिला असून, मागील निवडणुकीत सावर्डे पंचायत समिती गणातून त्यांनी विजय मिळवला होता. मात्र मागील जिल्हा परिषद निवडणुकीत याच गटातून शिवसेनेचे बाळकृष्ण जाधव विजयी झाले होते.
या निवडणुकीत जिल्हा परिषदेसाठी दोन माजी सभापती आमने-सामने आल्याने सावर्डे गटातील राजकीय लढतीला प्रचंड रंगत आली आहे. आमदार शेखर निकम यांची प्रतिष्ठाही या गटात पणाला लागली असून, सावर्डे गटात अखेर कोण बाजी मारणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.











