राज्यात समृद्धी नांदो, बळीराजाला भरघोस पीक लाभो!
🔷मुख्यमंत्री फडणवीसांनी विठुरायाच्या चरणी घातले साकडे
🔷मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विठुरायाची महापूजा
🔷’माने दाम्पत्य’ ठरले मानाचे वारकरी
पंढरपूर, दि. २५ : आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर श्रीक्षेत्र पंढरपूर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा अत्यंत भक्तिमय वातावरणात पार पडली. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पहाटे अडीच वाजता विठुरायाची विधिवत महापूजा करण्यात आली. यावेळी राज्यातील शेतकरी सुखी राहावेत, सर्वदूर समाधानकारक पाऊस पडावा आणि महाराष्ट्र समृद्ध व्हावा, अशी मनोभावे प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी अर्पण केली.
महापूजेनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी, “बळीराजाच्या आयुष्यात आनंदाचे दिवस यावेत, राज्यात भरपूर पाऊस पडून शेती समृद्ध व्हावी आणि प्रत्येक कुटुंब सुख-समाधानाने नांदावे,” अशी प्रार्थना केल्याचे सांगितले.
यंदाच्या शासकीय महापूजेचे विशेष आकर्षण ठरले ते धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गौरगाव येथील वारकरी दाम्पत्य बाळासाहेब माधव माने आणि प्रभावती बाळासाहेब माने यांचा गौरव. दरवर्षीप्रमाणे दर्शन रांगेतील एका निष्ठावान वारकरी दाम्पत्याला मुख्यमंत्र्यांसोबत महापूजा करण्याचा मान दिला जातो. यावर्षी हा बहुमान माने दाम्पत्याला मिळाला.
सुमारे ७० वर्षीय बाळासाहेब माने हे व्यवसायाने शेतकरी असून गेली वीस वर्षे ते नियमितपणे आळंदी-पंढरपूर पायी वारी करतात. यंदा त्यांनी पत्नीसह वारीत सहभाग घेतला होता. मध्यरात्री दर्शन रांग बंद झाल्यानंतर सर्वप्रथम असलेल्या माने दाम्पत्याची निवड समितीने ‘मानाचे वारकरी’ म्हणून निवड केली. विठ्ठलाच्या महापूजेत सहभागी होण्याची संधी मिळाल्याने त्यांनी भावूक होत समाधान व्यक्त केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येलाच पंढरपुरात दाखल झाले होते. आज पहाटे दोनच्या सुमारास ते पत्नी अमृता फडणवीस व कुटुंबीयांसह मंदिरात पोहोचले. त्यानंतर अडीच वाजता श्री विठ्ठलाची आणि त्यानंतर माता रुक्मिणीची शासकीय महापूजा विधिवत संपन्न झाली. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीची शासकीय महापूजा करण्याचा मान यंदा सलग सहाव्यांदा मिळविला.
महापूजेपूर्वी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची नित्यपूजा करण्यात आली. रुक्मिणी मातेची पूजा शिवाजी महाराज मोरे यांनी केली, तर पाद्यपूजेचा विधी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पार पडला.
यंदाच्या आषाढी यात्रेसाठी देशभरातून ३० लाखांहून अधिक भाविक पंढरपुरात दाखल झाल्याचा अंदाज आहे. विठ्ठल नामाच्या अखंड गजराने, टाळ-मृदंगाच्या निनादाने आणि वारकऱ्यांच्या भक्तिरसाने संपूर्ण पंढरी नगरी भारावून गेली आहे. चंद्रभागा नदीच्या तीरावर स्नानासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली असून संत नामदेव पायरी, महाद्वार, पश्चिम द्वार तसेच प्रदक्षिणा मार्गावर दिवसभर वारकऱ्यांची प्रचंड रेलचेल पाहायला मिळाली.
विठ्ठलाच्या पदस्पर्श दर्शनासाठी लागलेली रांग तब्बल २० किलोमीटरपर्यंत पोहोचली असून सुमारे ८० हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी प्रतीक्षेत असल्याचे प्रशासनाने सांगितले. राज्यभरातून आलेल्या लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत भक्ती, श्रद्धा आणि समतेचा संदेश देणारी आषाढी वारी यंदाही उत्साहात आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरी होत आहे.











