WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

चिपळूण नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडणुका बिनविरोध


चिपळूण नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडणुका बिनविरोध

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या विषय समित्यांच्या निवडणुका मंगळवारी शांततेत पार पडल्या. एकूण सहा विषय समित्यांपैकी तीन समित्यांवर भाजपने, तर तीन समित्यांवर शिवसेनेने वर्चस्व राखले. या निवडणूक प्रक्रियेत नगर परिषदेचे मुख्याधिकारी विशाल भोसले हे पीठासन अधिकारी म्हणून उपस्थित होते.

या निवडणुकीत पाणीपुरवठा व जलनिस्सारण समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे निहार कोवळे यांची निवड करण्यात आली. नियोजन व विकास समिती ही उपनगराध्यक्षांसाठी पदसिद्ध समिती म्हणून गठीत करण्यात आली असून, या समितीच्या अध्यक्षपदी उपनगराध्यक्ष रूपाली दांडेकर यांची निवड झाली.

महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी भाजपच्या रसिका देवळेकर, उपसभापतीपदी शिवसेनेच्या पल्लवी महाडिक, स्वच्छता, वैद्यकीय व सार्वजनिक आरोग्य समितीच्या सभापतीपदी भाजपचे शुभम पिसे, सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी शिवसेनेचे कपिल शिर्के, तर शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य समितीच्या सभापतीपदी शिवसेनेच्या हर्षली पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पिठासन अधिकारी विशाल भोसले यांनी बिनविरोध निवडीची घोषणा केली.

निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीला पीठासन अधिकारी विशाल भोसले यांनी सर्व नियमांचे वाचन केले. त्यानंतर समिती सदस्यांची संख्या निश्चित करण्यासाठी चर्चा झाली. सदस्यसंख्या सात असावी, असा ठराव मिथिलेश नारळकर यांनी मांडला असून, त्याला सफा गोठे यांनी अनुमोदन दिले.

संख्याबळानुसार समित्यांमध्ये सदस्यांची विभागणी करण्यात आली. त्यानुसार सात सदस्यीय समित्यांमध्ये शिवसेनेचे दोन, भाजपचे दोन, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) एक, काँग्रेसचा एक सदस्य, तर तीन समित्यांमध्ये शरद पवार राष्ट्रवादीचा एक सदस्य आणि उर्वरित तीन समित्यांमध्ये अजितदादा पवार राष्ट्रवादीचा एक सदस्य अशी रचना निश्चित करण्यात आली.

या निवडणूक प्रक्रियेसाठी उपमुख्य अधिकारी प्रमोद ठसाळे, सचिन शिंदे, संतोष शिंदे यांच्यासह नगर पालिकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. प्राथमिक शिक्षक पतपेढीच्या सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.

निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवनिर्वाचित विषय समित्यांच्या सभापतींचे अभिनंदन करण्यासाठी कार्यकर्ते, हितचिंतक व नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती.

मुख्याधिकाऱ्यांचे कौतुक

मुख्याधिकारी विशाल भोसले यांची बदली झाल्याने चिपळूण नगर पालिकेतील त्यांचीही शेवटची कौन्सिल सभा होती. नगराध्यक्ष उमेश सकपाळ, फैसल कासकर, योगेश पवार, शशिकांत मोदी, रसिका देवळेकर, अंकुश आवले, उपनगराध्यक्ष रुपाली दांडेकर आदी सर्वांनी मुख्याधिकाऱ्यांच्या कामाचे कौतुक केले. मुख्याधिकाऱ्यांनी चिपळूण शहराला एका वेगळ्या उंचीवर निल्याचे सर्वांनी सांगितले व त्यांना शुभेच्छा दिल्या.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!