असुर्डे येथे तिहेरी अपघात; एकाचा जागीच मृत्यू, तिघे जखमी
चिपळूण : मुंबईहून संगमेश्वरकडे जात असताना बेदरकारपणे वाहन चालविल्याने झालेल्या तिहेरी अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला असून तिघे जखमी झाले आहेत. ही घटना तालुक्यातील असुर्डे (ता. चिपळूण) येथे सकाळच्या सुमारास घडली.
सावर्डे पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, ओंकार अशोक मादगे (वय ३५, रा. साडवली, देवरुख) हे आपल्या होंडा कारने पुणे ते साडवली असा प्रवास करत होते. त्यांच्या सोबत पत्नी रूपाली आणि मुलगी साजिरी या होत्या. असुर्डे बौद्धवाडी येथे त्यांनी वाहन रस्त्याच्या कडेला उभे करून टपरीवर चहा पिण्यासाठी थांबले होते.
दरम्यान, मुंबईहून संगमेश्वरकडे जाणाऱ्या गिरीश चंद्रकांत गावडे (रा. माहीम, मुंबई) यांनी आपल्या ताब्यातील एर्टीगा ही कार भरधाव आणि बेदरकारपणे चालवित असताना प्रथम पादचारी विजय बाबाराम सावर्डेकर (रा. असुर्डे) यांना जोरदार धडक दिली. त्यानंतर नियंत्रण सुटून उभ्या असलेल्या मोटारगाडीला धडक बसली.
या भीषण अपघातात पादचारी विजय सावर्डेकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर मोटार चालक सुयोग तानाजी हुमणे, अंजली पवार, सुहास जाधव हे जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी हलविण्यात आले आहे. दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती मिळताच सावर्डे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. या अपघात प्रकरणी गिरीश गावडे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी वाढत्या वेगवान आणि बेदरकार वाहनचालकांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.











