गिरणी कामगार 10 मार्चला विधान भवनावर धडकणार
🔷चिपळुणातील सभेत एकमुखी निर्धार
🔷कामगार नेते गोविंदराव मोहिते यांची माहिती
चिपळूण : मुंबईतील गिरणी कामगार व त्यांच्या वारस कुटुंबियांना हक्काचे घर मिळवून देण्यासाठी शेवटपर्यंत लढा देणार असल्याचा निर्धार गिरणी कामगार संयुक्त लढा समितीचे निमंत्रक व राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी व्यक्त केला. येत्या 10 मार्च रोजी सकाळी 11 वाजता मुंबई येथे लाखो गिरणी कामगार, त्यांचे वारस व कुटुंबियांच्या उपस्थितीत विधान भवनावर भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
चिपळूण नगर परिषद समोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात जिल्ह्यातील गिरणी कामगार वारस व कुटुंबियांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला शेकडो वारस व कुटुंबिय उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना मोहिते म्हणाले की, गेली वीस वर्षे गिरणी कामगारांच्या घरांसाठी सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा करण्यात येत आहे; मात्र शासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता निर्णायक लढा उभारण्याची वेळ आली असून 10 मार्चचा मोर्चा हा त्याचाच एक भाग आहे.
पत्रकारांशी संवाद साधताना मोहिते यांनी सांगितले की, मुंबईसह राज्याच्या विकासात तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत गिरणी कामगारांचे मोठे योगदान राहिले आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात सुमारे २२ गिरणी कामगार हुतात्मा झाले. एकेकाळी मुंबईत सुमारे ५५ ते ६५ गिरण्या कार्यरत होत्या आणि त्यामध्ये दोन ते अडीच लाख कामगार कार्यरत होते. मात्र कालांतराने गिरण्या बंद पडल्या आणि हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह बंद झाला. रोजगार गमावलेल्या या कामगारांवर बेघर होण्याची वेळ आली.
सध्या अनेक गिरणी कामगार कुटुंबे गिरणगाव परिसरातील जुन्या वस्त्यांमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वास्तव्य करत आहेत. हक्काच्या घराबाबत न भूतो न भविष्यती अशी स्थिती निर्माण झाली आहे. शासनाने विविध गृहनिर्माण योजनांचा लाभ देऊन हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी त्यांनी केली. अन्यथा हा लढा अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
मोहिते यांनी आरोप केला की, गिरण्यांच्या जागा विकासाच्या नावाखाली मोठ्या उद्योगपती व बिल्डरांच्या घशात घालण्याचा प्रयत्न सुरू आहे. हा प्रयत्न हाणून पाडून शेवटच्या गिरणी कामगारास घर मिळेपर्यंत आंदोलन सुरूच राहील, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
बैठकीदरम्यान उपस्थित वारस व कुटुंबियांनी विविध शंका उपस्थित केल्या. त्या सर्व शंकांचे निरसन मोहिते यांनी केले. तसेच सुरेश मोरे यांनीही मोर्चाबाबत सविस्तर माहिती देत नियोजनाची रूपरेषा स्पष्ट केली.
गिरणी कामगारांना मुंबईतच घरे द्या!
गिरणी कामगारांना मुंबईबाहेरील वांगणी व शेलू येथे घरे देण्याचा प्रस्ताव कामगारांनी नाकारला आहे. गिरण्यांच्या मूळ जागांवरच किंवा मुंबई शहरातच पर्यायी घरे मिळावीत, ही त्यांची ठाम भूमिका आहे. मुंबईतील उपलब्ध गिरणी जागांवर घरकुल उभारून कामगारांना न्याय द्यावा, ही गिरणी कामगार संयुक्त लढा समितीची मागणी असून 10 मार्चच्या मोर्चात लाखोंच्या संख्येने सहभागी होऊन हा हक्काचा लढा अधिक तीव्र करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.












