WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

मनुस्मृती आणि ती मनोवृत्ती पुन्हा-पुन्हा जाळावीच लागेल : सुशांत जाधव


मनुस्मृती आणि ती मनोवृत्ती पुन्हा-पुन्हा जाळावीच लागेल : सुशांत जाधव

मनुस्मृती प्रकरणावरून शरद पोंक्षे यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध 

रत्नागिरी : मनुस्मृती जाळणाऱ्यांनी ती वाचली नाही असा एक नट बरळला. बाबासाहेबांनी जेंव्हा मनुस्मृती जाळली तेव्हा हजारो वर्षाचा अन्याय उजेडात आला आणि सामाजिक समतेचे पर्व सुरु झाले. मात्र शोषकांची मानसिकता १०० वर्षानंतरही बदलली नाही. त्यामुळे मनुस्मृती आणि ती मनोवृत्ती पुन्हा-पुन्हा जाळावीच लागेल, असा रोखठोक इशारा रत्नागिरीतील ग्राहक संरक्षण परिषद जिल्हा अशासकीय सदस्य सुशांत बबन जाधव यांनी दिला आहे. याबरोबरच त्यांनी अभिनेते शरद पोंक्षे यांच्या या वक्तव्याचा जाहीर निषेध देखील केला आहे.

अभिनेते शरद पोंक्षे यांनी “मनुस्मृती जाळणाऱ्यांनी ती वाचलीच नाही” असे केलेले वक्तव्य सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडले असून, विविध स्तरांतून त्याचा तीव्र निषेध व्यक्त केला जात आहे. रत्नागिरीतील ग्राहक संरक्षण परिषद जिल्हा अशासकीय सदस्य आयु. सुशांत बबन जाधव यांनी या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त करत आक्रमक भूमिका मांडली आहे. श्री. जाधव यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचा सखोल अभ्यास करूनच तिच्यातील अन्यायकारक, अमानवी आणि जातीय विषमता वाढवणाऱ्या विचारांचा निषेध केला होता. मनुस्मृतीमध्ये स्त्रिया, शूद्र आणि बहुजन समाजावर अन्याय करणारे अनेक नियम असल्यानेच तिचा विरोध करण्यात आला आणि मनुस्मृती दहन हे ऐतिहासिक आंदोलन म्हणून घडले.

या पार्श्वभूमीवर पोंक्षे यांचे विधान हे केवळ ऐतिहासिक वास्तव नाकारणारे नसून, बहुजन समाजाच्या वेदनांना कमी लेखणारे असल्याचा आरोप जाधव यांनी केला आहे. “अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे समाजात तणाव निर्माण होण्याची शक्यता असून, सामाजिक सलोखा धोक्यात येऊ शकतो,” असेही त्यांनी नमूद केले.

जाधव यांनी पुढे स्पष्ट केले की, इतिहासाचा अपमान, तसेच डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा अवमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. बहुजन समाजाच्या स्वाभिमानावर घाला घालणाऱ्या कोणत्याही वक्तव्याला ठाम विरोध करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
तसेच, समाजात ऐक्य टिकवण्यासाठी सत्याचा अभ्यास, वाचन आणि समतेच्या मूल्यांचा स्वीकार आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “फूट पाडणाऱ्या वक्तव्यांऐवजी समाजाने समता, न्याय आणि बंधुता या मूल्यांवर चालावे,” असे आवाहनही त्यांनी केले.

दरम्यान, या प्रकरणामुळे राज्यभरात चर्चेला उधाण आले असून, विविध सामाजिक संघटनांकडून पोंक्षे यांच्या वक्तव्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!