WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

कोयना प्रकल्पग्रस्तांसाठी जनजागर प्रतिष्ठानचा पाठपुरावा


कोयना प्रकल्पग्रस्तांसाठी जनजागर प्रतिष्ठानचा पाठपुरावा

माधव भंडारी यांच्या उपस्थितीत लवकरच मेळावा

चिपळूण : कोयना प्रकल्पामुळे चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी, पोफळी, नागावे, अलोरे, पेढांबे, पिंपळी या गावांतील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनी 1960 सालापासून संपादित करण्यात आल्या. मात्र विस्थापित व प्रकल्पग्रस्तांना दिलेली अनेक आश्वासने अद्याप पूर्ण झालेली नसून रोजगार, पुनर्वसन आणि नागरी सुविधा यांसारखे प्रश्न प्रलंबितच आहेत.

या पार्श्वभूमीवर मा. माधव भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनजागर प्रतिष्ठानने या प्रश्नांकडे लक्ष केंद्रीत केले आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी कोळकेवाडी येथे प्रकल्पग्रस्त ग्रामस्थांची प्राथमिक बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

बैठकीत अनेक प्रलंबित आणि निर्णायक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यावेळी पूर्वीच्या नेत्यांनी प्रश्न अर्धवट सोडल्याची खंत प्रकल्पग्रस्तांनी व्यक्त केली. यापुढे या प्रश्नांचा अखेरपर्यंत पाठपुरावा होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

या बैठकीस जनजागर प्रतिष्ठानचे राज्य समन्वयक देवराज देशमुख, कोकण संपर्क प्रमुख दिलीप गायकवाड, दिलीप शिंदे, पांडुरंग शिंदे, शरद शिंदे, अलोरेचे माजी सरपंच प्रकाश मोहिते, अनंत बोलाडे, मोहन कदम, जयवंत शिंदे आदी उपस्थित होते.

पंचक्रोशीतील सर्व प्रकल्पग्रस्तांना एकत्र करून मा. भंडारी यांच्या माध्यमातून दीर्घकाळ प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. अनेक वर्षांच्या फसवणुकीमुळे नाराज झालेल्या प्रकल्पग्रस्तांनी नव्याने एकत्र येण्याचे आवाहन कोकण प्रांत संपर्क प्रमुख दिलीप गायकवाड यांनी केले.

दरम्यान, येत्या काही दिवसांत अलोरे येथे प्रकल्पग्रस्तांचा मोठा मेळावा आयोजित करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती माजी सरपंच प्रकाश मोहिते यांनी दिली.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!