WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

निविदा प्रक्रियेपूर्वीच रस्ता डांबरीकरण!


निविदा प्रक्रियेपूर्वीच रस्ता डांबरीकरण!

चिपळूणमध्ये अजब प्रकार; बिल न देण्याची मागणी

चिपळूण : शहरातील विकासकामांबाबत सतत तक्रारी होत असतानाच आता एक धक्कादायक आणि आश्चर्यकारक प्रकार समोर आला आहे. मतेवाडी परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण काम अधिकृत निविदा प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच करण्यात आल्याने नागरिक अचंबित झाले आहेत. या घाईगडबडीत झालेल्या कामाच्या दर्जाबाबतही गंभीर शंका उपस्थित होत आहेत.

नगर पालिकेकडून शहरातील विविध विकासकामांसाठी निविदा प्रक्रिया सुरू असताना, मतेवाडी रस्त्याचे काम अद्याप मंजुरीच्या टप्प्यात होते. मात्र, ठेकेदाराची अधिकृत नियुक्ती होण्यापूर्वीच एका ठेकेदाराने थेट रस्ता डांबरीकरण पूर्ण केल्याचे उघड झाले. विशेष म्हणजे, या कामाबाबत पालिका प्रशासनालाच कोणतीही पूर्वकल्पना नसल्याचे मुख्याधिकारी संजय जाधव आणि नगर अभियंता दीपक निंबाळकर यांनी स्पष्ट केले.

पालिकेच्या नुकत्याच झालेल्या सभेत नगरसेवक फैसल कास्कर यांनी हा मुद्दा उपस्थित करत “निविदा प्रक्रिया सुरू असताना काम पूर्ण कसे झाले?” असा थेट सवाल केला. यावर प्रशासनाकडून अनभिज्ञता व्यक्त करण्यात आल्यानंतर कास्कर यांनी ठाम भूमिका घेत, “रस्ता झाला असेल तर पुढील प्रक्रिया करण्याची गरज नाही, पण या कामाचे बिल देऊ नये,” अशी मागणी केली.

दरम्यान, मतेवाडी येथील नागरिक गेल्या दोन-तीन वर्षांपासून खराब रस्त्यामुळे डांबरीकरणाची मागणी करत होते. मात्र सध्या करण्यात आलेले काम पूर्ण न होता मध्येच थांबवण्यात आले आहे. या कामाच्या गुणवत्तेबाबतही ग्रामस्थांनी शंका व्यक्त केली असून रस्ता समपातळीचा नसल्याचे निरीक्षण समोर आले आहे. अधिकारी अनुपस्थित असल्याचा फायदा घेत ठेकेदाराने मनमानी केल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे.

पालिका प्रशासनाकडून कोणतेही काम सुरू असताना संबंधित अभियंत्यांची उपस्थिती अपेक्षित असते. तरीदेखील असा प्रकार घडल्याने प्रशासनाच्या देखरेखीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. नगराध्यक्षांनी या प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सांगितले असून, पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

एकीकडे शासनाने ऑनलाईन निविदा प्रक्रिया प्रणालीमुळे पारदर्शकता वाढल्याचा दावा केला जात असताना, मतेवाडीतील हा प्रकार “कामे अजूनही मॅनेज होतात का?” असा सवाल उपस्थित करतो. निविदा उघडण्यापूर्वीच कोणत्या ठेकेदाराने इतक्या आत्मविश्वासाने काम पूर्ण केले, हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे चिपळूणमधील विकासकामांच्या पारदर्शकतेवर मोठा प्रश्नचिन्ह उभा राहिला असून, दोषींवर कठोर कारवाई होणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.


शहरातील मतेवाडी येथील रस्ता खराब झाल्याने गेल्या दोन तीन वर्षापासून येथील नागरिक डांबरीकरणाची मागणी करत होते. मात्र सध्या डांबरीकरणाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. हे काम थांबवण्यात आले आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर याबाबतची कार्यवाही केली जाणार आहे.

कपिल शिर्के, बांधकाम सभापती, चिपळूण नगर पालिका


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!