श्री केलमाई देवीची १ फेब्रुवारी रोजी वार्षिक यात्रा
चिपळूण : तालुक्यातील निर्व्हाळ येथील ग्रामदेवता श्री केलमाई देवीची वार्षिक यात्रा दि. १ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे. या निमित्ताने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दि. १ रोजी सायंकाळी यात्रोत्सवाला प्रारंभ होणार असून ग्रामदेवता श्री केलमाई देवीची पालखी चतुःसीमा भेटीसाठी निघेल. त्यानंतर पालखी सहाणेवर स्थानापन्न होईल.
रात्री १० नंतर रामपूर येथील ग्रामदेवता श्री केदारनाथ, वैजी-शिरळ-मालघर येथील ग्रामदेवता श्री सुखाई देवी तसेच भोम येथील ग्रामदेवतेच्या पालख्यांचे आगमन होणार आहे. यानंतर सर्व ग्रामदेवतांच्या पालख्यांचे स्वागत व पूजन करण्यात येईल. रात्री १२ वाजता ढोल-ताशांच्या गजरात व फटाक्यांच्या आतषबाजीत ग्रामदेवतांच्या पालख्यांचा नजरभेट सोहळा संपन्न होणार आहे. त्यानंतर श्री ग्रामदेवता लोककला नाट्य नमन मंडळ, माभळे (ता. संगमेश्वर) यांचे नमन सादर करण्यात येणार आहे. या यात्रोत्सवात भाविकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन निर्व्हाळ ग्रामस्थ व श्री केलमाई देवी देवस्थान समितीने केले आहे.












