दादर–सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस लवकरच २२ डब्ब्यांसह धावणार
🔷 बेलापूर मुख्यालयात प्रवासी महासंघ–कोंकण रेल्वे प्रशासनाची यशस्वी बैठक
🔷 कोकण रेल्वेच्या विकासाला मिळणार गती
🔷 सावंतवाडी टर्मिनस, नवे थांबे, पॅसेंजर गाड्या, लिफ्ट–सरकते जिने, ट्रॅक दुहेरीकरणावर सकारात्मक निर्णय
बेलापूर (नवी मुंबई) : कोकण रेल्वे प्रशासन आणि महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघ तसेच इतर कोकण रेल्वे संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक कोकण रेल्वेच्या बेलापूर मुख्यालयात यशस्वीरित्या पार पडली. या बैठकीत कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या विविध दीर्घकालीन मागण्यांवर सखोल चर्चा होऊन अनेक मुद्द्यांवर सकारात्मक निर्णय घेण्यात आले. यामध्ये दादर–सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस लवकरच २२ डब्ब्यांसह सुरु करण्यावर सकारात्मक चर्चा झाली.

या बैठकीस कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी आशुतोष श्रीवास्तव (कमर्शियल डिपार्टमेंट मॅनेजर), एल. प्रकाश (मेंटेनन्स व कन्स्ट्रक्शन), राजेंद्र कुमार शर्मा (यातायात विभाग), जुबेर पठाण (सुरक्षा आयुक्त), राजेंद्र दिनकर घोलप (तक्रार निवारण अधिकारी), राजेश ठोंबल (ट्रॅफिक ऑपरेशन), बाळासाहेब निकम (चिफ पर्सनल ऑफिसर) आणि पी. जी. नायर (डेप्युटी चीफ इंजिनिअर) उपस्थित होते.
सावंतवाडी टर्मिनस व स्थानक विकास
बैठकीत सावंतवाडी टर्मिनस इमारतीचे काम तातडीने सुरू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. टर्मिनस लाईनसाठी सुमारे ४०० कोटी रुपयांचा निधी आवश्यक असून सध्या निधीअभावी काम रखडले आहे. निधी उपलब्ध होताच कामाला गती दिली जाईल. सावंतवाडी स्थानकावर सरकता जिना (Escalator) व कोच इंडिकेशन सिस्टिम लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तसेच राजापूर, कुडाळ व कणकवली येथे सरकते जिने व लिफ्टच्या कामास लवकर प्रारंभ होणार आहे.
विलवडे स्थानकाच्या प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कणकवली, वांद्रे–मडगाव व नव्या थांब्यांवर चर्चा
कणकवली स्थानकावर प्लॅटफॉर्म शेड व प्लॅटफॉर्म वाढवण्याबाबत निवेदन देण्यात आले. वांद्रे–मडगाव रेल्वेगाड्यांना अधिक थांबे देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस–मंगळोर एक्सप्रेसला सावंतवाडी थांबा लवकरच मंजूर होणार असल्याचे संकेत देण्यात आले.
नव्या व पुन्हा सुरू होणाऱ्या गाड्या
दादर–सावंतवाडी तुतारी एक्सप्रेस लवकरच २२ डब्ब्यांसह सुरू केली जाणार आहे. कोरोना काळात बंद झालेला पनवेल राखीव जनरल डबा २२ डबे झाल्यानंतर पुन्हा सुरू होणार. रत्नागिरी–सावंतवाडी पॅसेंजर पुन्हा सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. पनवेल–चिपळूण MEMU पॅसेंजर वसईहून कायमस्वरूपी सोडण्याबाबत लवकर निर्णय अपेक्षित आहे.
ट्रॅक दुहेरीकरण व प्रकल्पग्रस्तांसाठी दिलासा
कोकण रेल्वेच्या ट्रॅक दुहेरीकरणासाठी (Track Doubling) प्राथमिक सर्वेक्षण सुरू असल्याची माहिती देण्यात आली. प्रकल्पग्रस्त (ज्यांची जमीन कोकण रेल्वेसाठी गेली आहे) यांच्यासाठी जागा राखीव असून, गरीब, गरजू व कोकणातील रहिवासी प्रकल्पग्रस्तांना नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी श्री. गणेश परब (मो. 7045086960) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले.
सिंधुदुर्ग PRS आरक्षण खिडकीबाबत आवाहन
सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकावरील PRS आरक्षण खिडकीला पुढील एक महिना मुदतवाढ देण्यात आली आहे. सध्या कमी तिकीट काढली जात असल्याने खिडकी बंद होण्याची शक्यता आहे. प्रवाशांनी दररोज अधिकाधिक आरक्षण तिकिटे PRS विंडोवरून काढावीत, अन्यथा विंडो बंद झाल्यास त्याची जबाबदारी महासंघाची राहणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले.
इतर महत्त्वाचे मुद्दे
कोल्हापूर–आजरा–चंदगड–बेळगाव मार्ग सावंतवाडीला जोडण्याबाबत निधी उपलब्ध झाल्यास विचार
मध्य रेल्वे अखत्यारीतील विषयांवर कोंकण रेल्वेसोबत समन्वय बैठक लवकरच आयोजित
बैठकीस उपस्थित मान्यवर
या बैठकीस महाराष्ट्र रेल्वे प्रवासी महासंघाचे अध्यक्ष व ZRUCC सदस्य अभिजीत धुरत, सल्लागार व संस्थापक सदस्य सुरेंद्र नेमळेकर, तसेच गणेश परब, अमित नार्वेकर, शक्तीप्रसाद शिरोडकर, सचिन धाडवे, वासुदेव गुरव, पवन पांचाळ, विक्रम येलवे, विनायक राणे, संतोष पालकर, रमण सावंत, सुनील उतेकर, तानाजी परब, अमित दुखंडे आदी उपस्थित होते.












