प्रा. विक्रांत बोथरे यांच्या चित्राची राष्ट्रीय प्रदर्शनासाठी निवड
सह्याद्री स्कूल ऑफ आर्टच्या शिरपेचात मानाचा तुरा
सावर्डे : कोकणातील अग्रगण्य कलामहाविद्यालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सह्याद्री स्कूल ऑफ आर्टने आपल्या यशाची परंपरा कायम राखत पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर गौरव मिळवला आहे. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या १३४ व्या ऑल इंडिया वार्षिक कला प्रदर्शनासाठी महाविद्यालयाचे प्राध्यापक व प्रसिद्ध चित्रकार प्रा. विक्रांत बोथरे यांच्या कलाकृतीची निवड झाली आहे. भारताच्या कला क्षेत्रात अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाणाऱ्या या प्रदर्शनात निवड होणे, हा सह्याद्रि शिक्षण संस्थेसाठी मोठा सन्मान मानला जात आहे.

बॉम्बे आर्ट सोसायटी ही आशियातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठित कला संस्था म्हणून ओळखली जाते. यंदाच्या १३४ व्या प्रदर्शनासाठी देशभरातून हजारो ऑनलाइन प्रवेशिका दाखल झाल्या होत्या. त्यातून निवडक आणि दर्जेदार कलाकृतींची निवड तज्ज्ञ परीक्षकांमार्फत करण्यात आली. या कठोर स्पर्धेतून प्रा. विक्रांत बोथरे यांच्या चित्राने आपले स्थान निश्चित केले आहे.
‘Divine Energy with Nature’ ही वैशिष्ट्यपूर्ण संकल्पना प्रा. विक्रांत बोथरे हे केवळ कुशल चित्रकार नसून लेखक आणि उत्तम मार्गदर्शकही आहेत. त्यांनी G.D. Art, Dip.A.Ed तसेच Interior Designer अशा पदव्या संपादन केल्या आहेत. पोर्ट्रेट, कॉम्पोजिशन, ॲबस्ट्रॅक्ट आणि लँडस्केप अशा विविध शैलींवर त्यांचे प्रभुत्व आहे. पेन्सिल, चारकोलपासून ते वॉटर कलर, ॲक्रेलिक आणि ऑइल कलरपर्यंतच्या सर्व माध्यमांत ते सहजतेने काम करतात.
त्यांच्या आध्यात्मिक ओढीतून आणि सखोल वाचनातून “Divine Energy with Nature” (निसर्ग आणि दैवी ऊर्जा) ही वैशिष्ट्यपूर्ण चित्रमालिका आकारास आली आहे. निसर्गातील सौंदर्य आणि त्यामागील अदृश्य आध्यात्मिक ऊर्जा यांचा सुंदर मिलाफ त्यांनी आपल्या चित्रांमधून प्रभावीपणे साकारला आहे. याच मालिकेतील चित्राची निवड या राष्ट्रीय प्रदर्शनासाठी झाली आहे.
संस्थेकडून अभिनंदनाचा वर्षाव
या उल्लेखनीय यशाबद्दल सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष तथा आमदार मा. श्री. शेखरजी निकम, सेक्रेटरी मा. श्री. महेश महाडिक, ज्येष्ठ चित्रकार-शिल्पकार प्रा. प्रकाश अर्जुन राजेशिर्के, सौ. पूजाताई निकम, श्री. अनिरुद्ध निकम, महाविद्यालयाचे प्राचार्य माणिक यादव तसेच सर्व प्राध्यापक वृंदाने प्रा. विक्रांत बोथरे यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे.
प्रा. बोथरे यांच्या या यशामुळे कोकणातील कलाक्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून विद्यार्थ्यांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत.
प्रा. विक्रांत बोथरे यांची भावना
“निसर्गातील अदृश्य दैवी शक्ती चित्रांच्या माध्यमातून मांडण्याचा माझा हा प्रयत्न आहे. बॉम्बे आर्ट सोसायटीसारख्या प्रतिष्ठित मंचावर या चित्राची निवड होणे ही माझ्यासाठी आणि आमच्या महाविद्यालयासाठी अत्यंत आनंदाची गोष्ट आहे.”
— प्रा. विक्रांत बोथरे (चित्रकार)
राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या या गौरवामुळे सह्याद्रि स्कूल ऑफ आर्टचा लौकिक अधिक वृद्धिंगत झाला असून कोकणातील कलाविश्वाला नवी प्रेरणा मिळाली आहे.











