WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

भोंदूबाबा खरात प्रकरण: रुपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा


भोंदूबाबा खरात प्रकरण : रुपाली चाकणकर यांचा अखेर राजीनामा

सात ओळींच्या पत्रात ‘वैयक्तिक कारण’ नमूद

मुंबई : नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणामुळे राज्यात मोठी राजकीय खळबळ उडाली असून त्याची पहिली मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार) पक्षाच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने खळबळ उडाली आहे. अशोक खरात या कथित भोंदूबाबाच्या प्रकरणात त्यांचं नाव अप्रत्यक्षपणे चर्चेत आल्यानंतर वाढत्या दबावामुळे हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे.

नाशिकमध्ये अशोक खरात याला एका महिलेच्या लैंगिक शोषण प्रकरणात पोलिसांनी अटक केली. त्यानंतर खरातचे अनेक कारनामे समोर येऊ लागले. या पार्श्वभूमीवर चाकणकर आणि खरात यांचे एकत्रित फोटो तसेच पाद्यपूजेचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामुळे विरोधकांनी तसेच सामाजिक स्तरावर त्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चाकणकर यांना पदाचा राजीनामा देण्याचे निर्देश दिल्याची माहिती समोर आली. त्यानंतर चाकणकर यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन अधिकृतपणे आपला राजीनामा सादर केला.

सात ओळींच्या पत्रात काय म्हटलं?
चाकणकर यांनी आपल्या राजीनामा पत्रात अत्यंत संक्षिप्त शब्दांत भूमिका मांडली आहे. त्यांनी नमूद केले की, १५ ऑक्टोबर २०२४ रोजी त्यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून नियुक्ती झाली होती. मात्र,“वैयक्तिक कारणास्तव मी स्वेच्छेने या पदाचा राजीनामा देत आहे,” असे त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. तसेच, आजवर मिळालेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत त्यांनी राजीनामा स्वीकारण्याची नम्र विनंती केली आहे.

‘सर्व दोषींवर कारवाई होणार’ : बावनकुळे
या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले की, “या प्रकरणात जे कोणी दोषी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. कोणालाही वाचवले जाणार नाही.”तसेच राज्यभरात अशा भोंदूबाबांच्या आश्रमांबाबतही तपासाची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले.

राजकीय व सामाजिक पडसाद
या घटनेमुळे राज्यातील महिला सुरक्षेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा गंभीर चर्चा सुरू झाली आहे. महिला आयोगाच्या सर्वोच्च पदावर असलेल्या व्यक्तीला राजीनामा द्यावा लागल्याने प्रशासनावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!