‘लक्ष्मी ऑरगॅनिक’वरून तणाव; प्रक्रिया केलेल्या पाण्यावरून वाद चिघळला
लोटे (ता. खेड) : लोटे एमआयडीसी परिसरातील Laxmi Organic Industries Ltd या कंपनीवरून पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून, प्रक्रिया केलेल्या पाण्याच्या टँकरवरून स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनामध्ये तणावाची स्थिती निर्माण झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी ऑरगॅनिकमधून प्रक्रिया केलेले पाणी टँकरद्वारे Common Effluent Treatment Plant (CETP) येथे नेले जात असताना स्थानिक ग्रामस्थांनी एक टँकर अडवला. टँकर पकडल्यानंतर CETP प्रशासनाने तो टँकर गेटच्या बाहेरच थांबवण्याचे निर्देश दिल्याने ग्रामस्थांचा संशय अधिकच बळावला

या टँकरमधील पाणी नेमके कोणत्या प्रकारचे आहे, याबाबत CETP प्रशासन तसेच टँकर चालक कोणतीही ठोस माहिती देऊ शकले नाहीत. यामुळे परिसरात संभ्रम आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून स्थानिक ग्रामस्थांकडून धरणे आंदोलन सुरू असतानाही कंपनीकडून नियमांचे उल्लंघन करून लोकांच्या जीवाशी खेळ केला जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात येत आहे. “आजवर उत्पादनातून निर्माण झालेले वेस्टेज थेट CETP मध्ये टाकले जात आहे,” असा आरोप आंदोलनकर्ते राजेंद्र आंब्रे यांनी केला.
घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी संबंधित टँकर थेट लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीच्या गेटवर आणत निषेध नोंदवला. यावेळी स्थानिक प्रतिनिधींनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि ग्रामस्थांशी चर्चा केली.
दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर कंपनी प्रशासनाने कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणार का आणि संबंधितांवर कारवाई होणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.













