WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

एकच उमेदवार ‘तुतारी’ फुंकणार!


एकच उमेदवार ‘तुतारी‘ फुंकणार!

राष्ट्रवादी (शरद पवार गट)च्या एकमेव महिला उमेदवार रिंगणात!

आघाडीच्या गोंधळातून पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर

चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या रणधुमाळीत स्वबळावर लढण्याचा नारा देणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)ची चिपळूण तालुक्यातील भूमिका प्रत्यक्षात मात्र मर्यादित उमेदवारीपुरतीच राहिली आहे. तालुक्यातून केवळ एकच उमेदवार रिंगणात उतरविण्यात आल्याने पक्षातील संघटनात्मक अस्थिरता आणि आघाडीबाबतचा गोंधळ उघडपणे समोर आला आहे.

चिपळूण नगर पालिका नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत झालेला पराभव जिव्हारी लागलेल्या माजी आमदार रमेशभाई कदम यांनी जि. प., पं. स.निवडणुकीच्या तोंडावर पक्षाची साथ सोडली. त्यामुळे पक्षाकडे तालुक्यात सक्षम नेतृत्व उरले नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पक्षाच्या अस्तित्वासाठी शिरगांव जिल्हा परिषद गटातून कुमारी अमिता अरुण मोडक यांना पक्षाकडून उमेदवारी देण्यात आली आहे. तालुक्यात तुतारी चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या त्या एकमेव महिला उमेदवार ठरल्या आहेत.

दरम्यान, अनेक जागांवर उमेदवार न देण्यामागील कारणांबाबत तालुकाध्यक्ष मुराद अडरेकर यांनी स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली आहे. उमेदवार न देण्याचा निर्णय हा निवडणुकीपासून पळ काढण्याचा नसून, गोंधळलेल्या आघाड्या, वैचारिक विसंगती आणि एकतर्फी निर्णयप्रक्रियांविरोधात घेतलेली जबाबदार भूमिका असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

राज्य पातळीवर भाजपसोबत सत्तेत असलेल्या गटाशी आघाडी करण्यासंदर्भात तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असहमती होती. कोणतीही वैचारिक स्पष्टता नसताना स्थानिक संघटनेवर आघाडी लादण्याचा प्रयत्न करण्यात आला, जो स्वीकारार्ह नसल्याचे अडरेकर यांनी स्पष्ट केले.

निवडणूक प्रक्रियेदरम्यान स्थानिक संघटनेशी कोणतीही चर्चा न करता परस्पर उमेदवार ठरवून उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे संघटनात्मक शिस्त आणि लोकशाही निर्णयप्रक्रियेला तडा गेला, असा गंभीर आरोपही त्यांनी केला. यामुळे तालुका संघटना आणि कार्यकर्त्यांना पूर्णतः डावलण्यात आल्याची भावना निर्माण झाली.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर नेतृत्व पातळीवर झालेले अनपेक्षित व सतत बदलणारे निर्णय यामुळे पक्षाची भूमिका अस्पष्ट राहिली. परिणामी इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते संभ्रमात सापडले. अशा अस्थिर वातावरणात उमेदवार उभे करणे म्हणजे त्यांना अनाठायी राजकीय त्रासाला सामोरे जाण्यास भाग पाडण्यासारखे ठरले असते, असेही त्यांनी नमूद केले.

पक्षाकडे सक्षम व लढाऊ उमेदवार उपलब्ध असतानाही, त्यांच्या सन्मान, प्रतिमा आणि राजकीय भवितव्याचे संरक्षण करण्यासाठीच अनेक ठिकाणी उमेदवार न देण्याचा निर्णय घेतल्याचे अडरेकर यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शिरगांव गटातील उच्चशिक्षित अमिता मोडक यांनी पवार साहेबांवरील निष्ठा आणि पक्षाचे अस्तित्व जपण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. तसेच चिपळूण तालुक्यातील काही गटांमध्ये स्थानिक कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आणि अजित पवार गटाशी झालेल्या चर्चेनंतर निलेश चव्हाण व सायली बंगाल यांना उमेदवारी देण्यात आल्याचेही स्पष्ट झाले आहे. मात्र ते दोन उमेदवार घड्याळ चिन्हावर निवडणूक लढविणार आहेत.

एकूणच, चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत राष्ट्रवादी (शरद पवार गट)मधील आघाडीविषयक मतभेद, नेतृत्वाचा अभाव आणि निर्णयप्रक्रियेतील विस्कळीतपणा चव्हाट्यावर आला असून, ही निवडणूक पक्षासाठी ताकद प्रदर्शनापेक्षा अंतर्गत संघर्ष अधिक उघड करणारी ठरत असल्याचे चित्र आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!