शिवीगाळ केल्याच्या रागातून मित्रालाच संपविले!
🔴कुर्णे खून प्रकरणाचा २४ तासांत छडा
🔴स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची जलद कारवाई
🔴एक संशयित आरोपी ताब्यात
लांजा : तालुक्यातील मौजे कुर्णे येथे घडलेल्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अवघ्या २४ तासांच्या आत छडा लावून एक संशयित आरोपी ताब्यात घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

दि. १९ जानेवारी २०२६ रोजी सुरेश रामचंद्र पडये (वय ४५, रा. कुर्णे, ता. लांजा) यांचा त्यांच्या राहत्या घरामध्ये कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. याबाबत लांजा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू रजिस्टर क्रमांक ०३/२०२६, बी.एन.एस.एस. २०२३ चे कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली होती. मात्र मृतकाच्या अंगावरील गंभीर जखमा तसेच घटनास्थळी मोठ्या प्रमाणावर सांडलेले रक्त पाहता हा मृत्यू नैसर्गिक नसून घातपातामुळे झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे व अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. नितीन ढेरे यांना तातडीने तपासाचे निर्देश दिले.
त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विशेष पथक तयार करून घटनास्थळाची बारकाईने पाहणी करण्यात आली. परिसरात सखोल चौकशी करताना व गोपनीय माहितीच्या आधारे संशय अधिक बळावला. अखेर नंदकुमार रविंद्र पांचाळ (वय २५, रा. कुर्णे सुतारवाडी, ता. लांजा) यास ताब्यात घेण्यात आले.
संशयित आरोपीकडे अधिक चौकशी केली असता त्याने मयत सुरेश पडये याने आपल्याला शिवीगाळ केल्याचा राग मनात धरून त्याच्याच घरात जाऊन त्याची हत्या केल्याची कबुली दिली आहे.
या प्रकरणी लांजा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १६/२०२६, भारतीय न्याय संहिता अंतर्गत कलम १०३ (१) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लांजा पोलीस ठाण्याच्या वतीने सुरू आहे.
ही संपूर्ण कारवाई पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील
श्रेणी पोलीस उपनिरीक्षक संदीप ओगले, सहायक पोलीस फौजदार सुभाष भागणे, पोलीस हवालदार विजय आंबेकर, पोलीस हवालदार दीपराज पाटील, चालक पोलीस कॉन्स्टेबल अतुल कांबळे यांनी केली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या जलद व प्रभावी कारवाईमुळे खून प्रकरणाचा छडा लागला असून पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.











