WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

‘आम्ही आबासाहेबांचे निसर्गप्रेमी’च्या वतीने नारळ वृक्षांचे रोपण


‘आम्ही आबासाहेबांचे निसर्गप्रेमी’च्या वतीने नारळ वृक्षांचे रोपण

वाशिष्ठी नदी तीरावरील पेढे-फरशी गणपती विसर्जन घाट परिसरातील उपक्रम

चिपळूण : महाराष्ट्र कृषी दिनाचे पार्श्वभूमीवर नुकतेच चिपळूण येथे वाशिष्ठी नदी तीरावरील पेढे-फरशी येथील ब्रीज आणि एम.आय.डी.सी.चे जल उदंचन केंद्र नजीकच्या गणपती विसर्जन घाट परिसरातील सार्वजनिक जागेत नारळीच्या १२ रोपांचे रोपण करण्यात आले. ‘आम्ही आबासाहेबांचे निसर्गप्रेमी’ या समूहाने नदी किनारच्या जागेचे पर्यावरण संवर्धन आणि हरित पट्ट्याच्या निर्मितीसाठी स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेत हा विशेष उपक्रम राबवला.

स्व. आबासाहेब मोरे यांचे समवेत सुमारे तीसेक वर्षे महाराष्ट्र राज्यात पर्यावरण जनजागरणाची चळवळ राबवणारे आणि चिपळूण तालुक्यात पहिले कृषी पर्यटक केंद्र सुरु करणारे विलास महाडिक यांनी आपल्या ‘ना नफा ना तोटा’ तत्त्वावरील नर्सरीतून ही रोपे उपलब्ध करून दिली. त्यांच्यासह स्थानिक उद्योजक प्रशांत देवळेकर यांनी या रोपांच्या संगोपनाची आणि संवर्धनाची जबाबदारी स्वीकारली. यामुळे विसर्जन घाटाच्या परिसराचे सुशोभीकरण, धूप थांबवण्यास मदत मिळणार आहे. तसेच या वृक्षारोपणामुळे गणपती विसर्जन घाटाच्या परिसरातील नैसर्गिक सौंदर्य वाढण्यास मदत होणार आहे. नदीकाठच्या भागात नारळाची झाडे लावल्यामुळे त्यांची मुळे माती घट्ट धरून ठेवतात. यामुळे पुराच्या काळात किंवा पाण्याच्या प्रवाहामुळे होणारी जमिनीची धूप मोठ्या प्रमाणावर टळण्यास मदत होईल, असे मत पर्यावरणप्रेमी साहित्यिक धीरज वाटेकर यांनी व्यक्त केले.

नारळ वृक्षांचे रोपणप्रसंगी महाडिक, देवळेकर, वाटेकर यांचेसह दापोलीतील निसर्गप्रेमी श्रीकृष्ण शिंदे, सचिन शिंदे, उक्ताडचे मधुकर लोटेकर उपस्थित होते.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!