गावात शाळा आहे… पण विद्यार्थी नाहीत!
चिपळूण तालुक्यात पटसंख्येअभावी तीन जिल्हा परिषद शाळांना टाळे; ग्रामीण शिक्षणासमोर अस्तित्वाचा प्रश्न
🔷 सुशांत कांबळे
चिपळूण : गावाच्या मध्यभागी उभी असलेली शाळेची इमारत… अंगणात शांतता… वर्गखोल्यांत मुलांचा गोंगाट नाही, प्रार्थनेचा आवाज नाही, फळ्यावर शिक्षकांचे अक्षर नाही. ही परिस्थिती एखाद्या दुर्गम गावाची नव्हे, तर चिपळूण तालुक्यातील काही जिल्हा परिषद शाळांची आहे. विद्यार्थीच नसल्याने यंदाच्या शैक्षणिक वर्षात रावळगाव क्रमांक २, मुंढे-खोतवाडी आणि निवळी-कोंडवाडी येथील जिल्हा परिषद शाळा बंद करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. ग्रामीण शिक्षणाच्या दृष्टीने ही अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बाब मानली जात आहे.
जिल्हा परिषद शाळा म्हणजे ग्रामीण भागातील लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा पाया. अनेक अधिकारी, शिक्षक, डॉक्टर, अभियंते, लोकप्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर याच शाळांतून घडले. मात्र बदलत्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीमुळे आज या शाळाच अस्तित्वासाठी झगडताना दिसत आहेत.
गेल्या काही वर्षांत ग्रामीण भागातून शहरांकडे होणारे स्थलांतर वाढले आहे. रोजगार, व्यवसाय आणि मुलांच्या शिक्षणासाठी अनेक कुटुंबांनी गाव सोडले. परिणामी गावातील लोकसंख्या कमी झाली आणि त्याचा थेट परिणाम जिल्हा परिषद शाळांच्या पटसंख्येवर झाला. दुसरीकडे, इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांकडे पालकांचा वाढता कलही जिल्हा परिषद शाळांसाठी मोठे आव्हान ठरत आहे.
विद्यार्थीसंख्या वाढावी म्हणून शिक्षण विभागाने आणि शिक्षकांनी अनेक उपक्रम राबवले. डिजिटल शिक्षण, गुणवत्तावाढ कार्यक्रम, प्रवेश मोहिमा, पालक भेटी, नाविन्यपूर्ण अध्यापन अशा विविध माध्यमांतून विद्यार्थ्यांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही आणि अखेर तीन शाळांवर कुलूप लावण्याचा निर्णय घ्यावा लागला.
ही परिस्थिती केवळ तीन शाळांपुरती मर्यादित नाही. आज तालुक्यातील अनेक जिल्हा परिषद शाळा अत्यल्प पटसंख्येवर सुरू आहेत. वेळेत उपाययोजना न झाल्यास भविष्यात आणखी शाळा बंद होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
विशेष म्हणजे, जिल्हा परिषद शाळांमध्ये आजही गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, डिजिटल वर्ग, क्रीडा, सांस्कृतिक स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, शिष्यवृत्ती परीक्षांतील यश अशा अनेक बाबतीत या शाळांतील विद्यार्थी उल्लेखनीय कामगिरी करत आहेत. त्यामुळे गुणवत्तेचा प्रश्न नसून विद्यार्थ्यांच्या उपलब्धतेचा प्रश्न अधिक गंभीर बनला आहे.
ग्रामीण भागातील शाळा बंद होणे म्हणजे केवळ एका इमारतीचे दरवाजे बंद होणे नव्हे, तर त्या गावाच्या भविष्यातील विकासाची एक खिडकी बंद होणे आहे. शाळा गेली की गावातील चैतन्य कमी होते, नवीन कुटुंबे गावात स्थायिक होण्यास टाळाटाळ करतात आणि ग्रामीण भाग आणखी ओस पडण्याचा धोका वाढतो.
शिक्षणतज्ज्ञांच्या मते, जिल्हा परिषद शाळा वाचवण्यासाठी केवळ शिक्षण विभागाचे प्रयत्न पुरेसे ठरणार नाहीत. ग्रामपंचायती, पालक, माजी विद्यार्थी, लोकप्रतिनिधी आणि समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन गावातील शाळा टिकविण्यासाठी पुढाकार घेणे काळाची गरज आहे. अन्यथा आज तीन शाळा बंद झाल्या असल्या, तरी उद्या ही संख्या वाढण्याची भीती नाकारता येत नाही.
जिल्हा परिषद शाळांमध्ये खासगी शाळांप्रमाणेच गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते. विविध शैक्षणिक उपक्रम, डिजिटल शिक्षण आणि गुणवत्तावाढ कार्यक्रम सातत्याने राबवले जातात. विद्यार्थ्यांनी क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. या शाळा टिकवण्यासाठी समाजातील सर्व घटकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे दादासाहेब इरनाक, (गटशिक्षणाधिकारी, चिपळूण) यांनी सांगितले.











