WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

भाजी मंडईसह मटण-मच्छी मार्केटवर आणखी होणार ८८ लाखांचा खर्च


भाजी मंडईसह मटण-मच्छी मार्केटवर आणखी होणार ८८ लाखांचा खर्च

नुतनीकरण कामांवर माजी नगरसेवक इनायत मुकादम यांचा आक्षेप

स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानुसार निर्णय घेण्याची मागणी; नव्याने इमारत उभारण्याचा पर्यायही सुचवला

चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या भाजी मंडई व मटण-मच्छी मार्केट इमारतीच्या प्रस्तावित सुमारे ८८.२८ लाख रुपयांच्या नुतनीकरणाच्या कामावर माजी नगरसेवक इनायत इब्राहिम मुकादम यांनी गंभीर आक्षेप घेतला आहे. मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून त्यांनी ही निविदा प्रक्रिया तात्काळ स्थगित करून सरकारमान्य संस्थेच्या स्ट्रक्चरल ऑडिट अहवालानुसार पुढील कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

मुकादम यांनी निवेदनात म्हटले आहे की, भाजी मंडई व मटण-मच्छी मार्केट इमारतीचे भूमिपूजन सन २००६ मध्ये झाले. मात्र, विविध कारणांमुळे आजतागायत हे काम पूर्ण झाले नाही. दरम्यान, २०१७ मध्ये मध्यवर्ती भागातील काही गाळ्यांचे वाटप करण्यात आले असले तरी उर्वरित गाळ्यांसाठी वारंवार लिलाव प्रक्रिया राबवूनही व्यापाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही.

यामागील प्रमुख कारण म्हणजे भाजी मंडईची विद्यमान रचना व्यवसायाभिमुख नसणे, तसेच इमारतीचे काम अपूर्ण राहिल्याचा दावा त्यांनी केला आहे. व्यापाऱ्यांच्या बैठकीत मंडईच्या दर्शनी भागातून थेट प्रवेश, गाळ्यांच्या रचनेत बदल आणि व्यवसायास पूरक सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्या वेळी प्रशासनाकडून आवश्यक फेरबदल करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. मात्र, त्याची अंमलबजावणी झालेली नसल्याचे त्यांनी नमूद केले.
दीर्घकाळ वापर न झाल्याने आणि पावसामुळे झालेल्या गळतीमुळे दोन्ही इमारती जीर्ण अवस्थेत पोहोचल्याचा दावा करत त्यांनी अशा परिस्थितीत पुन्हा लिलाव प्रक्रिया राबविणे योग्य नसल्याचे म्हटले आहे.

मुकादम यांनी निवेदनात नमूद केले आहे की, ४ जून २०२५ रोजी वालचंद कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सांगली या सरकारमान्य संस्थेने दोन्ही इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून अहवाल नगर परिषदेला सादर केला होता. या अहवालात इमारतींबाबत गंभीर निरीक्षणे नोंदविण्यात आली असून, संरचनात्मक अभियंत्यांच्या मार्गदर्शनाखाली दुरुस्ती व मजबुतीकरणाची कामे पूर्ण केल्यानंतरच इमारत वापरण्यायोग्य ठरेल, असे स्पष्टपणे नमूद करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

त्यांच्या म्हणण्यानुसार, या अहवालाकडे दुर्लक्ष करून मटण-मच्छी मार्केटमध्ये केवळ वरवरची दुरुस्ती, निकृष्ट दर्जाचे प्लास्टर आणि रंगरंगोटी करण्यात आली. त्यामुळे इमारत सुरक्षित असल्याचा आभास निर्माण करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. भाजी मंडईसंदर्भात मात्र ऑडिट अहवालातील कोणतीही महत्त्वाची उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

यापूर्वी २०२२-२३ मध्ये भाजी मंडईसाठी सुमारे ६२ लाख रुपये आणि मटण-मच्छी मार्केटसाठी ५७ लाख रुपये खर्चाच्या नुतनीकरणाला प्रशासकीय व आर्थिक मंजुरी मिळाल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. मात्र, त्या मंजुरीनंतर कोणतीही कार्यवाही न होता आता दोन्ही कामे एकत्रित करून सुमारे ८८ लाख रुपयांची निविदा प्रक्रिया राबविण्यात येत असल्याबद्दल त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

पुढील ३० वर्षांसाठी व्यापाऱ्यांना गाळे देण्याचा विचार होत असताना, सध्याच्या स्थितीत या इमारती पुढील काही वर्षेही सुरक्षित राहतील, याबाबत शंका असल्याचे मुकादम यांनी नमूद केले आहे. त्यामुळे लाखो रुपये खर्च करून नुतनीकरण करण्याऐवजी व्यवसायाभिमुख आराखडा तयार करून दोन्ही इमारतींचे नव्याने बांधकाम करण्याचा पर्याय गांभीर्याने विचारात घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

या निवेदनाची प्रत माहिती व पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकारी, रत्नागिरी यांनाही पाठविण्यात आली आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!