आम्ही पक्षातच नसल्याने निलंबनाचा विषय येतो कुठे? : परिमल भोसले
भाजप पक्षाच्या कारवाईला दिले सडेतोड उत्तर
चिपळूण : चिपळूण नगर परिषदेच्या निवडणुकीनंतर स्थानिक राजकारणात नवे वादंग निर्माण झाले आहे. भारतीय जनता पार्टी (भाजप) कडून पक्षविरोधी कारवायांच्या आरोपाखाली चार पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर आता माजी नगरसेवक परिमल भोसले यांनी पक्षीय कारवाईवरच प्रश्न उभा केला आहे. आम्ही पक्षाचा आणि सदस्यत्वाचा यापूर्वीच राजीनामा दिला होता. आता आम्ही पक्षातच नसल्याने माझ्या निलंबनाचा प्रश्न येतो कुठे? असे सडेतोड उत्तर देत ही कारवाई हास्यास्पद असल्याचा खुलासा केला आहे.
परिमल भोसले यांनी स्पष्ट केले की, चिपळूण नगर परिषदेची निवडणूक प्रक्रिया सुरू असतानाच त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा व पदाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे आपण सध्या पक्षाचे सदस्य नसून कोणतेही पक्षीय कामही करत नसल्याने आपल्यावर निलंबन किंवा हकालपट्टीची कारवाई करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
“मी सध्या भाजपचा सदस्य नाही. त्यामुळे माझ्यावर पक्षशिस्तभंगाची कारवाई झाल्याचा दावा वस्तुस्थितीला धरून नाही,” असे भोसले यांनी नमूद केले.
याच संदर्भात माजी नगराध्यक्षा सुरेखा नितीन खेराडे (माजी जिल्हाध्यक्षा, महिला मोर्चा उत्तर रत्नागिरी) आणि सुधीर सुधाकर पानकर यांच्याबाबतही पक्षातून हकालपट्टी झाल्याचे सांगण्यात येत असल्याचे त्यांनी नमूद केले. मात्र संबंधितांनी यापूर्वीच पक्षाचा राजीनामा दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच श्रीराम शंकर शिंदे (माजी शहराध्यक्ष, चिपळूण शहर मंडळ) यांनीही आधीच पक्षत्याग केला असल्याचे सांगण्यात येत आहे. संबंधित पदाधिकाऱ्यांनी आपण पक्षाचे सदस्यच नसल्याचा खुलासा केल्यामुळे या कारवाईच्या वैधतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.












