WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

जिल्हा बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन गांगण यांचे निधन


जिल्हा बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन गांगण यांचे निधन

चिपळूण : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा चिपळूण तालुका वैश्य पतसंस्थेचे माजी अध्यक्ष जीवन गांगण (वय ६४) यांचे शनिवारी दुपारी १ वाजता हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.

तालुक्यातील पालवण येथे सुरू असलेल्या ग्रामीण कृषी सहकार साहित्य संमेलनात ते सहभागी झाले होते. कार्यक्रमादरम्यान त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने उपस्थित सहकाऱ्यांनी तातडीने त्यांना डेरवण येथील वालावालकर येथे दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.

जीवन गांगण यांनी अनेक वर्षे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून जबाबदारी सांभाळली. बँकिंग क्षेत्रातील त्यांचा प्रदीर्घ अनुभव आणि शिस्तबद्ध कारभार यामुळे ते सहकार क्षेत्रात आदराचे स्थान मिळवून होते. सुमारे तीन वर्षांपूर्वी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतला. चिपळूण तालुका वैश्य पतसंस्थेच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली होती.

कोरोना कालावधीत त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. ते मूळचे मालघर गावचे रहिवासी होते व सध्या चिपळूण शहरातील खेंड बायपास रोड परिसरात वास्तव्यास होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे व भाऊ असा परिवार आहे. सहकार, बँकिंग आणि सामाजिक क्षेत्रातील त्यांच्या योगदानामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!