WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

‘खरात फाईल’ उघड व्हायला एवढा वेळ का लागला? : आमदार भास्कर जाधव


‘खरात फाईल’ उघड व्हायला एवढा वेळ का लागला? : आमदार भास्कर जाधव

चिपळूण : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया देताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) नेते व आमदार भास्करशेठ जाधव यांनी राज्यातील राजकीय आणि सामाजिक ढोंगीपणावर जोरदार टीका केली. “मी एपस्टीन फाईलचे उदाहरण दिलं. त्यात जगभरातील लोक होते; पण आपल्या राज्यातील आणि विशेषतः नाशिकमधील लोकांचा एका प्रकरणात सहभाग असल्याचं उघड होण्यासाठी एवढा वेळ का लागला?”असा रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केला.

आमदार जाधव पुढे म्हणाले की, राजकारणी एका बाजूला अंधश्रद्धा निर्मूलनाचे कायदे पास करतात आणि दुसऱ्या बाजूला त्याच विचारांच्या विरोधात वागतात. आपण छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेतो; पण कृती मात्र त्यांच्या विचारांच्या विरुद्ध करतो. मला काही कळत नाही हे अघोरी विद्या, हे अघोरी प्रकार जे काही आहेत बाबा, बाया, बुवा कशा करता ह्यांना लागतात? दुसऱ्याला उपदेश करताना मात्र फार मोठं तत्वज्ञान या गोष्टी करायच्या आणि स्वतः मात्र शेण खायचं असे हे लोक दिसतायत. यांना एखादा चांगला जर राज्यकर्ता भेटला, ते यांना धडा शिकवेल आणि तो शिकवला पाहिजे.

अघोरी विद्या आणि भोंदूबाबांच्या प्रभावाबद्दल आश्चर्य व्यक्त करत त्यांनी, “हे लोक अशा प्रकारांना बळी कसे पडतात, हेच समजत नाही,” असेही नमूद केले. दुसऱ्यांना उपदेश करणारेच लोक स्वतः अशा अंधश्रद्धांना बळी पडतात, अशी टीका करत जाधव म्हणाले, “समाजासाठी आदर्श असणाऱ्यांनीच अशा कृत्यांत सहभागी होणं धक्कादायक आहे. अशा प्रवृत्तींचा कठोर बंदोबस्त झाला पाहिजे. पुढील २५-५० वर्षांत कुणीही असा विचार करण्याचं धाडस करणार नाही, असा धडा शिकवला पाहिजे. मात्र, सध्याच्या सरकारकडून तशी अपेक्षा नाही,” असा टोलाही त्यांनी लगावला.

दरम्यान, राज्यातील अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर बोलताना जाधव यांनी कोकणातील शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती मांडली. “जवळपास १२ जिल्ह्यांत अवकाळी पावसामुळे आंबा, काजू, फणस, कोकम, नारळ यांसारखी पिकं पूर्णपणे उद्ध्वस्त झाली आहेत. यंदा आंब्याचा मोठा मोहोर होता; गेल्या २५ वर्षांत एवढा उत्पादनाचा अंदाज नव्हता. मात्र, आता ५ टक्केही फळ शिल्लक राहिलेलं नाही,” असे त्यांनी सांगितले.

हापूस आंब्याच्या निर्यातीवरही परिणाम होणार असल्याचे त्यांनी नमूद केले. “युद्धजन्य परिस्थितीमुळे आंब्याची निर्यातही होणार नाही, त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे,” असे ते म्हणाले. कोकणातील शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केल्याचे सांगत जाधव म्हणाले की, “१७ तारखेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक झाली. अधिवेशन संपण्यापूर्वी मदतीची घोषणा करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे.” आंबा बागायतदारांसाठी हेक्टरी ५ लाख रुपये आणि काजू उत्पादकांसाठी ३ लाख रुपये नुकसानभरपाईची मागणी करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या पार्श्वभूमीवर, भोंदूबाबा प्रकरण आणि अवकाळी पावसामुळे उद्भवलेले शेतकरी संकट या दोन्ही मुद्द्यांवर आमदार भास्कर जाधव यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

 


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!