पं.स. सदस्य मंगेश बांडागळे यांनी घेतले माजी आमदार रमेशभाई कदम यांचे आशीर्वाद
चिपळूण : संगमेश्वर पंचायत समितीतील हातिव पंचायत समिती गणाचे नवनिर्वाचित सदस्य मंगेश बांडागळे यांनी रविवारी सकाळी चिपळूणचे माजी आमदार, तसेच चिपळूण नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष रमेशभाई कदम यांची त्यांच्या ‘जयेश’ या निवासस्थानी भेट घेऊन आशीर्वाद व मार्गदर्शन घेतले. यावेळी रमेशभाई यांनी त्यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
नुकत्याच पार पडलेल्या पंचायत समिती निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर मंगेश बांडागळे यांनी आपल्या राजकीय प्रवासातील ज्येष्ठ नेत्यांची भेट घेण्याचा ध्यास घेतला असून त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी रमेशभाई कदम यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी त्यांच्या राजकीय वाटचालीतील अनुभव, आगामी कामकाज आणि मतदार संघातील विकासाबाबत चर्चा केली.
मंगेश बांडागळे यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीची सुरुवात रमेशभाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचे बोट धरून केली होती. त्यांच्या सहवासातूनच त्यांनी लोकांशी संवाद साधणे, संघटन उभारणी आणि कार्यपद्धती यांचे धडे घेतले. पुढे २०१४ साली आमदार शेखर निकम यांच्या सोबत त्यांनी आपला राजकीय प्रवास पुढे नेला.
यावेळी बोलताना बांडागळे म्हणाले की, राजकारणात सुरुवातीच्या काळात रमेशभाई कदम यांनी दिलेलं प्रेम, आधार आणि मार्गदर्शन हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचे ठरले आहे. ते मी कधीही विसरू शकत नाही. पंचायत समिती निवडणुकीत विजय मिळाल्यानंतर रमेशभाईंनी स्वतःहून फोन करून माझे अभिनंदन केले होते. त्यामुळे आज प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्या आशीर्वाद घेण्याची इच्छा पूर्ण झाली.
रमेशभाई कदम यांची प्रत्येक भेट ही शिकण्याची संधी असते. त्यांच्या अनुभवातून आजही अनेक गोष्टी आत्मसात करता येतात, असेही त्यांनी सांगितले.
या भेटीत जुन्या आठवणींना उजाळा मिळाला असून, पुढील काळात मतदार संघाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करण्याचा निर्धार मंगेश बांडागळे यांनी व्यक्त केला.














