सिमेंट काँक्रीट रस्त्यावर डांबराचा पॅचवर्क!
राष्ट्रीय महामार्ग विभाग, ठेकेदाराचा अजब कारभार
✒️सुशांत कांबळे
गुहागर : गुहागर–विजापूर राष्ट्रीय मार्गावरील मार्गताम्हाने ते रामपूर परिसरात राष्ट्रीय महामार्ग विभाग व संबंधित ठेकेदार यांच्या कामकाजावर शंका उपस्थित करणारा प्रकार समोर आला आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या रस्त्यावर ठिकठिकाणी तडे गेले असून काही भागात रस्त्याची अल्पावधीतच दुर्दशा झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे या त्रुटी दुरुस्त करण्याऐवजी संबंधित विभागाने त्यावर डांबराचा पॅचवर्क करून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
मार्गताम्हाने ते रामपूर दरम्यान काही महिन्यांपूर्वीच सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करण्यात आला. मजबूत आणि टिकाऊ रस्ता होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती. मात्र, अवघ्या काही काळातच रस्त्यावर तडे जाणे, पृष्ठभाग उखडणे, तसेच काही ठिकाणी खड्डे निर्माण होणे असे प्रकार दिसून येत आहेत. यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे.
या पार्श्वभूमीवर संबंधित भागात डांबर टाकून पॅचवर्क करण्यात येत आहे. सिमेंट काँक्रीट रस्त्यावर डांबराचा थर देणे हे तांत्रिकदृष्ट्या योग्य नसल्याचे जाणकारांचे मत आहे. त्यामुळे ही उपाययोजना तात्पुरती असून मूळ कामातील त्रुटी झाकण्यासाठीच हा प्रकार केला जात असल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
स्थानिक नागरिकांनी या कामाची गुणवत्ता तपासून संबंधित कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच दोषपूर्ण काम पुन्हा नव्याने करून दर्जेदार रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशीही मागणी होत आहे. अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिला आहे.
दरम्यान, या प्रकाराबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांची भूमिका काय आहे, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.












