मंदार कदम याच्यावर कठोर कारवाई करावी!
विकृत कृत्याच्या निषेधार्थ चिपळूणमधील जागृत नागरिकांचे पोलिसांना निवेदन
निपक्षपाती कारवाईची सुद्धा केली मागणी
चिपळूण : चिपळूण ही सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक परंपरा जपणारी भूमी असून, अशा ठिकाणी विकृत मानसिकतेतून घडलेला प्रकार अत्यंत निषेधार्ह आहे. या पार्श्वभूमीवर चिपळूणमधील सुज्ञ व जागृत नागरिकांनी आज चिपळूण पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांची भेट घेऊन संशयित आरोपी मंदार कदम याच्याविरोधात कठोरात कठोर कायद्यानुसार कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी केली.
या घटनेमुळे संपूर्ण शहराच्या सांस्कृतिक विचारधारेला तडा गेला असून, भविष्यात अशा स्वरूपाचे गुन्हे पुन्हा घडू नयेत, यासाठी पोलीस प्रशासनाने कडक भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली. आरोपीवर कोणताही दबाव न घेता निपक्षपाती आणि कायद्याच्या चौकटीत कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
या निवेदनावेळी छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड तसेच इतर सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व संघटनांनी एकत्र येत या अन्यायाविरोधात आपली भूमिका मांडली आणि चिपळूणच्या शांतता व सांस्कृतिक मूल्यांचे संरक्षण करण्यासाठी कठोर कारवाई आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी चिपळूण पोलीस निरीक्षकांनी प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन कायद्यानुसार योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली












