अभिनेत्री विभावरी देशपांडे, किशोरी पेडणेकर, प्रा. डॉ. सरीता भवानी-मालविय यांना ‘सावित्रीच्या लेकी’ राष्ट्रीय पुरस्कार
इंडियन स्टुडंट कौन्सिलकडून ३१ जानेवारीला पुण्यात सन्मान सोहळा
पुणे : लोकशाही, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, विज्ञानभिमुखता आणि राष्ट्रवाद या पंचसूत्री मूल्यांवर आधारित कार्य करणाऱ्या इंडियन स्टुडंट कौन्सिल या समतावादी विद्यार्थी-शिक्षक संघटनेच्या वतीने सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘सावित्रीच्या लेकी’ राष्ट्रीय पुरस्कार २०२६ यंदा तीन कर्तृत्ववान महिलांना जाहीर करण्यात आला आहे. सांस्कृतिक, राजकीय आणि संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अभिनेत्री विभावरी देशपांडे, मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि उत्तरप्रदेश येथील संशोधक प्रा. डॉ. सरीता भवानी-मालविय यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.
इंडियन स्टुडंट कौन्सिल ही ‘माहिती व तंत्रज्ञान युगातील विद्यार्थी, शिक्षक व प्राध्यापक यांची समतावादी संघटना’ या घोषवाक्याखाली कार्यरत असून, गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या शिक्षण व सामाजिक क्षेत्रात तिने आपला स्वतंत्र ठसा उमटवला आहे. ग्रामीण व कष्टकरी विद्यार्थ्यांचे प्रश्न, तसेच विनाअनुदानित व तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या शिक्षक-प्राध्यापकांचे न्याय्य हक्क यासाठी ही संघटना सातत्याने संघर्ष करत आहे. सामाजिक जाणिवा आणि स्त्री-समानतेच्या विचारांना अधोरेखित करण्यासाठी सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान महिलांना ‘सावित्रीच्या लेकी’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.
आतापर्यंत या पुरस्काराने सांस्कृतिक क्षेत्रातील अभिनेत्री स्पृहा जोशी, सुहिता थत्ते, पर्ण पेठे, अश्विनी गिरी, राजकीय क्षेत्रातील माजी आमदार विद्यातीई चव्हाण, खासदार फौजिया खान, माजी आमदार यशोमती ठाकूर, तसेच माध्यम, शिक्षण व संशोधन क्षेत्रातील सरिता कौशिक, प्राचार्य डॉ. स्मिता देशमुख, डॉ. भावना पाटोळे, प्राचार्य डॉ. मीता रामटेके, प्रा. डॉ. प्रज्ञा लोखंडे, प्रा. डॉ. माधवी महाके यांसह अनेक मान्यवर महिलांचा गौरव करण्यात आला आहे.
या पुरस्काराचे वितरण यापूर्वी मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. भालचंद्र मुणगेकर, ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव, विचारवंत डॉ. श्रीपाल सबनीस, प्रा. सुभाष वारे, ज्येष्ठ कवी-गायक अरुण म्हात्रे, उल्हासदादा पवार आणि नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधाताई पाटकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यंदाचा ‘सावित्रीच्या लेकी’ पुरस्कार सोहळा शुक्रवार, दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ठीक ४.०० वाजता, फुलेवाडा, समता भूमी, गंजपेठ, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अभिनेत्री सुषमा देशपांडे आणि ज्येष्ठ कवी व गायक अरुण म्हात्रे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
या सोहळ्याच्या आयोजनासाठी प्रा. डॉ. धनाजी थोरे, प्रा. डॉ. माधवी महाके, प्रा. डॉ. रोहित गायकवाड, प्रा. डॉ. मीता रामटेके, प्रा. डॉ. रेखा बडोदेकर, प्रा. आरती खातू, प्रा. कल्पना सिद्धेवाड, सारिका शिंदे, सुवर्णा शिंदे, सोनिया इथापे, सौ. मीना साळुंके, प्रा. डॉ. निता कदम आदी कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत. अशी माहिती इंडियन स्टुडंट कौन्सिलचे महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. डॉ. ज्ञानोबा कदम आणि उपाध्यक्ष प्रा. माधुरी राऊत यांनी दिली.











