सोनगावमध्ये पीफास विरोधात ग्रामस्थ एकवटले
🔷लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रीज लिमिटेडच्या प्रकल्पाविरोधात सभा
🔷हुसैन दलवाई यांची उपस्थिती
खेड : तालुक्यातील सोनगाव येथील रामवरदायिनी मंदिरात कोकण पर्यावरण संरक्षण संघर्ष समिती यांच्या वतीने लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीकडून निर्मिती होणाऱ्या पीफास या घातक रसायनाविरोधात जाहीर सभा पार पडली. माजी मंत्री हुसैन दलवाई यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या सभेला सोनगाव ग्रामस्थांची मोठी उपस्थिती लाभली.

सभेत पर्यावरण अभ्यासक पंकज दळवी यांनी पीफास या रसायनामुळे होणाऱ्या संभाव्य पर्यावरणीय व आरोग्यविषयक धोक्यांचे सविस्तर विश्लेषण केले. त्यांनी जलस्रोतांचे प्रदूषण, शेतीवरील परिणाम आणि मानवी आरोग्यावर होणाऱ्या दुष्परिणामांविषयी माहिती देत सावधगिरीचा इशारा दिला.
प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते राजन इंदुलकर यांनी गेली तीन दशके लोटे औद्योगिक संकुलातील विविध रासायनिक कंपन्यांमुळे परिसरातील मासेमारी, शेती, बागायत आणि नागरी जीवन धोक्यात आल्याचा आरोप केला. स्थानिकांच्या समस्या जाणून घेत न्यायालयीन आणि संसदीय मार्गाने लढा उभारण्यात येईल, अशी भूमिका त्यांनी मांडली.
आंदोलनाचे समन्वयक भरत लब्ध्ये यांनी ८ जानेवारी रोजी काढण्यात आलेल्या मोर्च्याचा उल्लेख करताना सुरुवातीला सर्वांपर्यंत पोहोचता न आल्याची खंत व्यक्त केली. मात्र हुसैन दलवाई यांच्या नेतृत्वामुळे हा प्रश्न राज्य व केंद्र स्तरावर पोहोचल्याचे त्यांनी सांगितले. राज्यसभेचे खासदार प्रमोद तिवारी यांनी पीफास उत्पादनामुळे होणाऱ्या परिणामांबाबत केंद्र व राज्य सरकारची जबाबदारी निश्चित केली पाहिजे, असे मत व्यक्त केल्याचेही त्यांनी नमूद केले.
शेती, जनावरे आणि जलस्रोतांवर परिणाम
सभेदरम्यान ग्रामस्थांनी औद्योगिक प्रदूषणामुळे परिसरातील आंबा, काजू व रानमेवा पिकांवर परिणाम झाल्याची तक्रार केली. सरकारने सर्वेक्षण करून आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली. या मागणीला उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत पाठिंबा दिला.
सोनगावचे गावप्रमुख संदीप घाग यांनी बैठकीचे संयोजन केले. प्रथमेश घाग, विलास नलावडे, दत्ताराम घाग, विष्णू साळुंखे, शशिकांत गमरे आदींनी स्थानिक रासायनिक संकुलामुळे होणाऱ्या प्रदूषणाच्या समस्यांकडे लक्ष वेधले. कंपन्यांची आरोग्य पथके केवळ औपचारिक तपासण्या करतात; मात्र प्रदूषण कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करण्यात आला.
सोनगाव हे पाणथळ व जलसमृद्ध गाव असूनही सीईटीपीमधून बाहेर पडणारे दूषित पाणी नैसर्गिक जलस्रोतांमध्ये मिसळत असल्याने दुभती जनावरे दगावल्याच्या घटना घडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. त्यामुळे सध्या गावकऱ्यांना एमआयडीसीच्या पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत असल्याची खंत व्यक्त करण्यात आली.
स्थानिकांच्या सहभागाशिवाय लढा अपुरा : हुसैन दलवाई
सभेच्या शेवटी हुसैन दलवाई यांनी हे आंदोलन पूर्णपणे स्थानिकांच्या हक्कासाठी असल्याचे स्पष्ट केले. प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झाली तरी त्याला सामोरे जाण्याची तयारी असल्याचे सांगत, स्थानिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय दीर्घकालीन प्रदूषण प्रश्न सुटणार नाहीत, असे त्यांनी नमूद केले.
औद्योगिक वसाहती परिसरातील सर्व गावांमध्ये बैठका घेऊन नागरिकांशी संवाद साधल्यानंतर तज्ज्ञांच्या उपस्थितीत परिषद आयोजित करण्यात येईल. त्यानंतर पुढील आंदोलनाची दिशा निश्चित करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली.“आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध मी आपल्यासोबत आहे,” अशी ग्वाही देत एकजुटीचे आवाहन त्यांनी केले.
ग्रामस्थांनी एकमुखाने पाठिंबा दर्शवत दलवाई यांनी नेतृत्व स्वीकारावे, अशी मागणी केली. विशेष म्हणजे, याच दिवशी दलवाई यांचा वाढदिवस असल्याने सोनगाववासीयांनी त्यांचा वाढदिवस उत्साहात साजरा केला.
या सभेला सिडकोचे निवृत्त अधिकारी मकरंद संसारे, अन्वर खान, सुरेश पाथरे, अहमद दलवाई, सुमती जांभेकर, रविना गुजर, स्वाती भोजने, संध्या घाडगे, पूर्वा आयरे, सौ. कदम आदी मान्यवर उपस्थित होते.












