WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

‘गणपत वाणी बिडी पिताना’ समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेचे उद्या पारितोषिक वितरण


‘गणपत वाणी बिडी पिताना’ समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेचे उद्या पारितोषिक वितरण

बृहन्महाराष्ट्रासह जगभरातील मराठी कवींच्या पसंतीस उतरली होती स्पर्धा

चिपळूण : येथील महाराष्ट्र साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषद शाखांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या अभिनव स्वरुपाच्या ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव स्मृतीप्रित्यर्थच्या ‘गणपत वाणी बिडी पिताना’रा ज्यस्तरीय समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा उद्या (शनिवारी, दि. २१) संपन्न होत आहे. आजवरच्या साहित्य इतिहासात अशा प्रकारचा हा पहिलाच क्रियाशील प्रयोग असल्याने बृहन्महाराष्ट्रासह जगभरातील मराठी कवींमध्ये या स्पर्धेबाबत कमालीची उत्सुकता होती. हा समारंभ लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात सायंकाळी ५ ते ७ या वेळात संपन्न होईल. ‘आपलं चिपळूण’ संस्था या स्पर्धा पारितोषिक वितरण सोहळ्याची सहआयोजक आहे.

या पारितोषिक वितरण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून एअर मार्शल (निवृत्त) हेमंत भागवत, कन्साई नेरोलॅक पेन्टस लि.चे जनसंपर्क अधिकारी संतोष देशमुख, उद्योजक प्रशांत पाटेकर, ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, ज्येष्ठ नगसेवक शशिकांत मोदी आदी मान्यवर उपस्थित राहाणार आहेत.

यावेळी स्पर्धेतील विजेता १ – अतुल नरहर देशपांडे (नाशिक), विजेता २ – किरण वेताळ (पुणे), विजेता ३ – डॉ. मनोज सुर्यकांत वराडे (मुंबई), उत्तेजनार्थ १ – विजय यशवंत सातपुते (पुणे), उत्तेजनार्थ २ – विजया गुळवणी (पुणे), उत्तेजनार्थ ३ – वृंदा सचिन कुलकर्णी (पालघर), उत्तेजनार्थ ४ – सुधीर सोमकांत नागले (रायगड) उत्तेजनार्थ ५ – हर्षदा सुंठणकर (बेळगाव). प्रोत्साहनपर १ – सुजाता संजय (लंडन), प्रोत्साहनपर २ – डेविड पेनकर (इस्त्रायल), प्रोत्साहनपर ३ – शर्मिला पटवर्धन (बंगलोर), प्रोत्साहनपर ४ – सुषमा राम वडाळकर (बडोदे), प्रोत्साहनपर ५ – कविता पुणतांबेकर ‘कुमुद’ (इंदौर), प्रोत्साहनपर ६ – सारिका दत्तात्रय बिवलकर (रत्नागिरी), प्रोत्साहनपर ७ – मेधा विनायक लोवलेकर (चिपळूण) आदींना गौरविण्यात येणार आहे.

शनिवारी दिवसभर भरगच्च कार्यक्रम
शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या रौप्य महोत्सवाचे औचित्य साधून शनिवारी दिवसभर विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते ११.३० वाजता कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यासाठी आयत्या वेळेच्या विषयांवरील वक्तृत्व स्पर्धा होणार आहे. सकाळी ११.३० ते १२.३० वाजता नुकत्याच संपन्न झालेल्या बांधावरच्या संमेलनाचे अध्यक्ष प्रा. सुहास बारटक्के यांचा साहित्यिक प्रवास उलगडणारी मुलाखत होईल. ही मुलाखत विनायक ओक आणि विलास महाडिक घेतील.

दुपारनंतरच्या सत्रात ३.३० ते ५ या वेळेत राज्यस्तरीय समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेतील पारितोषिक विजेते कवी आणि निमंत्रिक कवींचे कवीसंमेलन होणार आहे. कवीसंमेलनाचे सूत्रसंचालन राष्ट्रपाल सावंत करतील. यानंतरच्या पारितोषिक वितरण सोहळ्याच्या पहिल्या टप्प्यात ‘लोटिस्मा’चा प्रतिष्ठेचा श्रीकांत गोवंडे बालवान्द्मय पुरस्कार राजापूरचे बालसाहित्यिक मदन हजेरी यांना प्रदान करण्यात येईल. त्यानंतर समस्यापूर्ती काव्यलेखन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळासंपन्न होईल.

एखाद्या सर्वज्ञात कवीच्या गाजलेल्या कवितेची ओळ घेऊन त्याच्या मूळ कवितेपेक्षा अगदी वेगळ्या धाटणीच्या अभिव्यक्तीची कविता निर्माण करून त्यातून सद्यस्थितीची विविधांगी मांडणी करणे आणि त्यातून चर्चित, अचर्चित समाज वास्तवाला भिडणे असे या अभिनव स्पर्धेचे स्वरूप होते. या अभिनव साहित्यिक उपक्रमाच्या पारितोषिक वितरण समारोहास साहित्यप्रेमींनी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा चिपळूणचे अध्यक्ष संतोष गोनबरे आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे चिपळूण अध्यक्ष अरुण इंगवले यांनी कळवले आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!