उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या आगमनाने ‘सह्याद्री’ गहिवरला!
शब्द पाळत ‘अक्षय–मुक्ता’ला दिले मायेचे आशीर्वाद
सावर्डे : शब्दाला जागणारे नेतृत्व ही ओळख जपणाऱ्या स्व.अजितदादा पवार यांच्या आठवणींनी सावर्डेतील वातावरण भारावून गेले. त्यांच्या अकाली निधनानंतरही त्यांनी दिलेला शब्द तितक्याच निष्ठेने पूर्ण करत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अक्षय आणि मुक्ताच्या विवाह सोहळ्यास उपस्थित राहून नवदांपत्याला आशीर्वाद दिले.

चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांच्या कन्या मुक्ता व ओवळीचे रवींद्र शिंदे यांचे ज्येष्ठ सुपुत्र अक्षय यांचा विवाह सोहळा शुक्रवारी सावर्डे येथे उत्साहात पार पडला. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचा शब्द स्व.अजितदादा पवार यांनी आमदार निकम यांना दिला होता. मात्र नियतीच्या क्रूर खेळाने त्यांच्या अपघाती निधनामुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला.

अशा वेळी दिलेला शब्द अपूर्ण राहू न देता, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार स्वतः सावर्डे येथे उपस्थित राहिल्या. त्यांनी अक्षय व मुक्ताला शुभाशीर्वाद देत पवार-निकम कुटुंबातील जिव्हाळ्याचे संबंध पुन्हा अधोरेखित केले. त्यांच्या आगमनाने संपूर्ण परिसरात भावनिक वातावरण निर्माण झाले. अनेकांच्या डोळ्यांत अश्रू तरळले; कारण त्या क्षणी उपस्थित प्रत्येकाला अजितदादांची उणीव प्रकर्षाने जाणवत होती.

राजकारणात शब्दाला जागणारा नेता म्हणून स्व. अजित पवार यांची ख्याती होती. कामाचा झपाटा, निर्णयक्षमता आणि दिलेल्या वचनांप्रती असलेली बांधिलकी ही त्यांची ओळख होती. त्याच परंपरेचा सन्मान राखत सुनेत्रा पवार यांनी दाखवलेली ही संवेदनशीलता सर्वांच्या मनाला भिडणारी ठरली. सावर्डेतील हा विवाह सोहळा केवळ कौटुंबिक कार्यक्रम न राहता, शब्द, नातेसंबंध आणि विश्वास यांची जपणूक करणारा भावनिक क्षण ठरला. सह्याद्रीच्या कुशीत आज जिव्हाळा, आठवणी आणि नात्यांची ऊब एकत्र अनुभवायला मिळाली.
या सोहळ्यासाठी उद्योगमंत्री व पालकमंत्री उदय सामंत, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ , आनंदराव अडसूळ ,आमदार भास्कर जाधव, आ. प्रकाश सुर्वे ,आ. चव्हाण,आ.योगेश सागर, माजी आमदार राजन साळवी, अनिकेत तटकरे ,वैभव नाईक,माजी आमदार सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष संदेश पारकर,माजी आमदार साळुंखे , अनेक आमदार व माजी आमदार तसेच राज्यभरातून मान्यवर पदाधिकारी व मराठी अभिनेते संजय खापरे, प्रभाकर मोरे,क्रिकेट प्रशिक्षक चंद्रकांत पंडित, श्री. लाड ,बाबाजी जाधव , तसेच सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी ,नगरसेवक, चिपळूण संगमेश्वर सहित जिल्ह्यातील मान्यवर या विवाह सोहळ्यासाठी उपस्थित होते.


दरम्यान, स्व. अजितदादा पवार यांच्या एका आठवणीने सुनेत्रा पवारही भावुक झाल्याचे दिसले. रत्नागिरी जिल्ह्यातील सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या परिसरात उभारण्यात आलेले स्व. गोविंदराव निकम साहेब यांच्या ‘स्मृतिगंध’ स्मारकाच्या उद्घाटनावेळी राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांच्या हस्ते लावण्यात आलेले सुरंगीचे झाड आज मोठे झाले आहे; अभिमानाने उभे आहे. दादांनी झाड कधी लावलं होतं, याची माहिती आमदार शेखर निकम यांनी सुनेत्रा पवार यांना देताच त्या झाडाजवळ जाऊन सुनेत्रा पवार यांनी त्याला वंदन केले. हा क्षण अनेकांच्या डोळ्यांत अश्रू आणणारा ठरला. एका वृक्षारोपणाच्या कृतीतूनही दादांनी जपलेली समाजसेवेची आणि शिक्षणप्रेमाची भावना आजही आपल्याला प्रेरणा देते. अजितदादांच्या स्मृतींच्या स्मरणार्थ त्या झाडाजवळ उभारण्यात येणारे शिल्प हे पुढील पिढ्यांसाठी मूल्यांची जपणूक करणारे प्रतीक ठरेल. आपल्या कर्तव्याप्रती एकनिष्ठ राहण्यासाठी अनेकांना हे शिल्प प्रेरित करेल.











