साहित्यिकांप्रति नगर पालिका व्यक्त करणार कृतज्ञता
मराठी भाषा दिनानिमित्त सत्कार सोहळा व काव्यवाचन स्पर्धा
चिपळूण : मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून शुक्रवार, दिनांक २७ फेब्रुवारी रोजी चिपळूण नगर परिषदेच्या वतीने, लोकमान्य टिळक स्मारक वाचनालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालय यांच्या सहकार्याने विशेष साहित्यिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात साहित्यिकांचा सत्कार, तसेच काव्यवाचन स्पर्धा होणार असल्याची माहिती नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी दिली. काव्यवाचन स्पर्धा खुल्या गटात होणार असून मराठी हा विषय आवश्यक आहे.
हा कार्यक्रम चिपळूण नगर परिषदेच्या इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला असून नगराध्यक्ष उमेश सकपाळ, उपनगराध्यक्ष रूपालीताई दांडेकर, मुख्याधिकारी संजय जाधव, तसेच सर्व सभापती व नगरसेवकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
यानंतर ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, प्रा. सुहास बारटक्के, स्मिताताई देवधर, अरुण इंगवले, प्रा. संतोष गोणबरे, मुजफ्फर सय्यद, डॉ. प्रशांत पटवर्धन, राष्ट्रपाल सावंत, संत साहित्याचे अभ्यासक धनंजय चितळे, प्रकाश (आप्पा) जाधव, रवींद्र गुरव आदी मान्यवर साहित्यिकांचा सत्कार करण्यात येणार आहे. याचवेळी काव्यवाचन स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, त्यानंतर साहित्यिक सन्मान व कथाकथनाचा कार्यक्रम होणार आहे. अखिल भारतीय नाट्य परिषद, शाखा चिपळूण यांच्या वतीने हा कथाकथन कार्यक्रम सादर केला जाणार आहे.
या स्पर्धेतील विजेते, तसेच सहभागी कवी आणि कथाकथन करणाऱ्या कलाकारांचा शनिवार, दिनांक १ मार्च रोजी मराठी भाषा मंत्री तथा पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या हस्ते चिपळुणात गौरव करण्यात येणार आहे.
या साहित्यिक पर्वाला चिपळूणमधील विद्यार्थी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी केले आहे.












