अनंत साळवी यांना राज्यस्तरीय ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर
समाजसेवेच्या अखंड प्रवासाला मानाचा मुजरा
‘आषाढ वारी’ कार्यक्रमात उद्या होणार गौरव
शिरगाव (मुनीर शेख) : समाजासाठी केलेल्या निस्वार्थ कार्याचा आणि अनेक दशकांच्या सेवाभावी योगदानाचा गौरव म्हणून ज्येष्ठ समाजसेवक अनंत एकनाथ साळवी यांना चैतन्य आर्ट्स चिपळूण (रजि.) संस्थेतर्फे राज्यस्तरीय ‘जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या या निवडीमुळे शिरगाव परिसरासह सामाजिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त शनिवार, दि. २५ जुलै २०२६ रोजी चिपळूण येथील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात आयोजित ‘आषाढ वारी’ या भक्तिमय कार्यक्रमात महाराष्ट्रातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. त्यामध्ये अनंत साळवी यांची झालेली निवड त्यांच्या दीर्घकाळाच्या निस्वार्थ समाजसेवेची राज्यस्तरीय दखल मानली जात आहे.
अनंत साळवी यांनी आयुष्यभर समाजालाच आपले कुटुंब मानत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला. गरजूंना मदतीचा हात देणे, गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणे, सामाजिक ऐक्य जपणे, युवकांना मार्गदर्शन करणे आणि कोणत्याही प्रसिद्धीची अपेक्षा न ठेवता समाजकार्यात स्वतःला वाहून घेणे, ही त्यांची ओळख बनली आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेकांना आधार मिळाला असून, त्यांनी समाजात विश्वास आणि माणुसकीचे नाते अधिक दृढ केले आहे.
आजच्या प्रसिद्धीच्या युगात निस्वार्थपणे समाजहितासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी होत असताना, अशा सेवाभावी व्यक्तिमत्त्वाचा सन्मान होणे ही समाजासाठी प्रेरणादायी बाब असल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. त्यांच्या कार्यातून अनेक युवकांना समाजसेवेची प्रेरणा मिळाली असून, माणुसकीची मूल्ये जपण्याचा संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.
पुरस्काराची घोषणा होताच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अनंत साळवी यांचे अभिनंदन केले आहे. हा सन्मान योग्य व्यक्तीच्या वाट्याला आल्याची भावना व्यक्त करत त्यांच्या पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छाही देण्यात आल्या.
अनंत एकनाथ साळवी यांना जाहीर झालेला ‘जीवनगौरव पुरस्कार’ हा केवळ एका व्यक्तीचा गौरव नसून, निस्वार्थ समाजसेवा, समर्पण आणि माणुसकीच्या मूल्यांचा सन्मान असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे.











