चिपळूण येथे पर्यावरण जनजागृती उपक्रम
रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशनचा पुढाकार
चिपळूण, दि. २४ : २८ जुलै रोजी साजऱ्या होणाऱ्या जागतिक निसर्ग संवर्धन दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळा, वडार कॉलनी (चिपळूण) येथे रिजनल टिचर्स ऑर्गनायझेशन, दापोली-रत्नागिरी पर्यावरण जिल्ह्याच्या वतीने ‘निसर्ग संवर्धन कसे करावे’ या विषयावर मार्गदर्शनपर जनजागृती उपक्रम उत्साहात पार पडला.
या उपक्रमामध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरण संरक्षण, निसर्ग संवर्धन आणि पर्यावरणाचा समतोल राखण्याचे महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पर्यावरणाचा ऱ्हास रोखण्यासाठी प्रत्येकाने झाडे लावणे, त्यांचे संगोपन करणे, प्लास्टिकचा वापर टाळणे आणि निसर्गाशी सुसंवाद राखणे आवश्यक असल्याचे यावेळी विद्यार्थ्यांना सांगण्यात आले.
कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सेजल राजेंद्र जाधव, शिक्षिका सौ. अंजली अंकुश घाडगे तसेच सानिया शेख यांच्यासह शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सौ. वर्षा खटके-पाटील (रत्नागिरी पर्यावरण जिल्हाध्यक्ष) आणि सौ. अपूर्वा गायकवाड (चिपळूण पर्यावरण तालुकाध्यक्ष) यांनी विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी, निसर्गाचे महत्त्व आणि भावी पिढीसाठी पर्यावरण जतन करण्याची गरज याविषयी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मुख्याध्यापिका सौ. सेजल जाधव यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर आयोजकांच्या वतीने मुख्याध्यापिकांना वृक्ष भेट देण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून त्यांचे आभार मानण्यात आले.
विद्यार्थ्यांनीही पर्यावरण संरक्षणाची शपथ घेत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. जागतिक निसर्ग संवर्धन दिनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेला हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.












