नवरा-बायको एकाचवेळी निवडणूक रिंगणात!
शिवसेना–भाजप युतीकडून सौ. विनया व विनोद झगडे यांचा अर्ज
अलोरे गण-गटातील लढत ठरणार लक्षवेधी
सुशांत कांबळे
चिपळूण : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अलोरे परिसरातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. १९, अलोरे जिल्हा परिषद गटातून शिवसेना–भाजप युतीच्या सौ. विनया विनोद झगडे, तर ३७, अलोरे पंचायत समिती गणातून विनोद प्रकाश झगडे यांनी आपले उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केले. विशेष म्हणजे या निवडणुकीत नवरा–बायको एकाच वेळी निवडणूक रिंगणात उतरल्याने अलोरे गटात राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
उमेदवारी अर्ज सादर करताना सौ. सीमाताई सदानंद चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सपकाळ, प्रणव झगडे, विशाल ओसवाल यांच्यासह शिवसेना–भाजप युतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून आले.
श्री. विनोद झगडे हे माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती असून, त्यांच्या कार्यकाळातील विकासकामांमुळे त्यांना प्रशासनाचा व लोकसंपर्काचा मोठा अनुभव आहे. त्या अनुभवाचा लाभ पंचायत समितीच्या माध्यमातून थेट ग्रामीण विकासासाठी घेण्याचा त्यांचा मानस असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
तर सौ. विनया झगडे या महिला नेतृत्व म्हणून पुढे येत असून, महिला सक्षमीकरण, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षण या मुद्द्यांवर भर देत विकासाचा अजेंडा घेऊन मतदारांसमोर जाणार आहेत. “अनुभव आणि नव्या नेतृत्वाची सांगड” अशी ही उमेदवारी असल्याचे युतीच्या नेत्यांनी स्पष्ट केले.
नवरा–बायको दोघेही एकाच वेळी निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने अलोरे गटातील लढत अधिक रंगतदार होणार असून, प्रतिस्पर्धी गटांनीही जोरदार तयारी सुरू केली आहे. येत्या काळात प्रचाराचा जोर वाढताच या गटातील राजकीय गणिते अधिक स्पष्ट होणार आहेत.











