सहा महिन्याच्या गर्भवती महिलेस आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पती व सासू यांना दहा वर्षे सक्तमजुरी व दंडाची शिक्षा
चिपळूण जिल्हा न्यायालयाचा निकाल
चिपळूण : तालुक्यातील डेरवण येथील ६ महिने गरोदर विवाहितेचा एक लाख रुपयाच्या मागणीसाठी छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांनी आरोपी पती दिनेश महादेव कदम ( वय ३४ वर्षे) व सासू मिनाक्षी महादेव कदम (वय ५७ वर्षे) या दोन्ही आरोपींना भा.द.वि कलम ४९८ (अ), ३०६ सह ३४ या गुन्हयाखाली दोषी धरून १० वर्षे सक्तमजूरी व प्रत्येकी ३५०००/- रू दंड व दंड न भरल्यास प्रत्येकी ६ महिने सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

गुन्हयाबाबत थोडक्यात हकिकत अशी की, सदरचा गुन्हा सावर्डे पोलीस ठाण्याचे हद्दीत घडला असून त्यातील मयत काव्या दिनेश कदम (वय २५) वर्षे हिने घराशेजारील विहिरीत उडी मारुन आत्महत्या केली. तिचा विवाह दिनांक १५/०५/२०१५ रोजी आरोपी दिनेश याचेसोबत झाला होता. विवाहनंतर सुमारे ४ महिन्यातच तिचा पती व सासू यांनी गाडीसाठी रुपये १,००,०००/- माहेरहून आणण्याबाबत तगादा लावला. तसेच त्या कारणावरुन मयत हिला धर्मपत्नीचा दर्जा न देता पतीने मारझोड केली व घराबाहेर काढले व घराच्या शेडमध्ये राहण्यास सांगितले. आरोपीत क्र. २ सासू सौ. मिनाक्षी महादेव कदम हिने घरातील कामावरुन तसेच किरकोळ कारणावरुन सतत टोचुन बोलुन मयत हिचा वेळोवेळी मानसिक व शारीरिक त्रास देऊन छळजांच केला. दोन्ही आरोपी मयत काव्या हिला विहिरीला पंप असतानासुध्दा हाताने पाणी काढायला लावत. खर्चाला पैसे देत नसत व रक्कम रुपये १,००,०००/- ची मागणी माहेरच्यांनी पूर्ण केली नसल्यामुळे तिला अपमानित करुन एकटीला सतत माहेरी पाठवत. त्यांच्या वादाबाबत दोन्ही नातेवाईकांच्याकरवी मिटींगसुध्दा घेण्यात आल्या होत्या. परंतु आरोपींच्या वागण्यात कोणताही फरक पडला नव्हता. गर्भवती असतानां देखील आरोपींनी वारंवार पैशाचा तगादा लावून तिचे जगणे असहय करुन तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने मयत तिने सासरचे घरासमोरीलच विहीरीत गर्भवती असतांना दि. २१/११/२०१६ रोजी उडी मारुन आत्महत्या केली म्हणून आरोपी पती व सासूविरुध्द भा.दं.वि.सं. कलम ४९८ (अ), ३०६ सह ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरच्या गुन्हयाचा तपास पूर्ण झाल्यावर सावर्डे पोलिसांनी न्यायालयात आरोपीविरुध्द दोषारोपपत्र दाखल केले होते.
सदर सत्र खटल्याची सुनावणी चिपळूण येथील जिल्हा न्यायाधीश डॉ. अनिता एस. नेवसे यांचेसमोर सुरु होती. सदर कामी सरकारी वकील श्री. प्रफुल्ल साळवी यांनी एकूण ८ साक्षीदार तपासले. मयत हिची आई, भाऊ व शेजारी तसेच सावर्डे पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी श्री. शरद कुवेस्कर व श्री. सचिन इंगोल यांच्या साक्षी महत्वपूर्ण ठरल्या. आरोपीतर्फे ३ साक्षीदार बचावासाठी तपासण्यात आले होते. सदर कामी सरकारी वकील यांनी न्यायालयासमोर प्रभावी युक्तिवाद मांडला व त्यांचा युक्तीवाद ग्राहय धरुन आरोपी पती दिनेश महादेव कदम व सासू मिनाक्षी महादेव कदम यांना जिल्हा न्यायाधीश डॉ. श्रीमती अनिता एस. नेवसे यांनी दोषी ठरवून भा.दं.वि.सं. कलम ३०६ अन्वये १० वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी २५,०००/- रुपये दंड तसेच दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास आणि भा.दं. वि.सं. कलम ४९८(अ) अन्वये ३ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी १०,०००/- रुपये दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली. आरोपीतर्फे शिक्षेबाबत न्यायालयामध्ये युक्तीवाद करताना त्याचे दुसरे लग्न केले असून त्याला एक मुलगी आहे व त्याचे वडील ज्येष्ठ नागरीक आहेत. त्यामुळे कमीत कमी शिक्षेची मागणी केली मात्र न्यायालयाने मयत काव्या ही आत्महत्या करताना ६ महिन्याची गरोदर होती त्यामुळे यामध्ये दोन निष्पाप जीव गेल्याने गुन्हयाची गंभीरता विचारात घेवून कायद्याने दिलेली १० वर्षाची शिक्षा आरोपींना दिली.
या न्यायनिर्णयाने पिडीतेला व तिच्या कुटुंबियांना न्याय मिळाल्याची भावना मयत काव्याच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. या शिक्षेमुळे हुंडाबळी व कौंटुबिक हिंसाचारग्रस्त महिलांवर होणा-या अत्याचारामध्ये कायद्याचा धाक बसून अशा गुन्हयामध्ये घट होईल अशी प्रतिक्रिया सरकारी वकीलांनी दिली. सदर सत्र खटल्याकामी सरकार पक्षातर्फे सरकारी वकील श्री. प्रफुल्ल साळवी यांनी काम पाहिले तसेच तपासिक अंमलदार पोलीस निरीक्षक श्री. शरद कुवेस्कर व श्री. सचिन इंगोले यांनी गुन्हयाचा सखोल तपास केला व पैरवी अधिकारी म्हणून पो. हवालदार श्री. मिनाद कांबळे यांनी काम पाहिले.











