बांगलादेश मुक्ती संग्रामचे साक्षीदार माजी सैनिक बयाजी जाधव यांचे निधन
उद्या पुण्यानुमोदन आणि आदरांजली सभा
चिपळूण : बांगलादेश मुक्ती संग्रामचे साक्षीदार, खेंड बावशेवाडी (वरची बावशेवाडी) येथील ज्येष्ठ सभासद, माजी अध्यक्ष (दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा ग्रामशाखा) आणि माजी सैनिक हवालदार बयाजी देवजी जाधव यांचे दिनांक 26 एप्रिल 2026 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. निधन समयी ते 75 वर्षांचे होते.
बयाजी जाधव यांचा जन्म 15 सप्टेंबर 1951 रोजी खेंड बावशेवाडी येथे झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वाढ झाल्याने त्यांनी जेमतेम प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर लहानपणापासूनच कष्टाची कामे केली. देशसेवेची जिद्द मनात बाळगून त्यांनी वयाच्या 19 व्या वर्षी लष्करामध्ये भरती होण्याचा निर्णय घेतला आणि दि. 28 सप्टेंबर 1969 रोजी भारतीय सैन्यात दाखल झाले.
लष्करातील सेवाकाळात त्यांनी बंगलोर येथे ASC (MT) ड्रायव्हर म्हणून कार्य केले. 1971 च्या बांगलादेश मुक्ती संग्रामात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून उल्लेखनीय कामगिरी बजावली. या कामगिरीबद्दल त्यांना सैनिकी पदकाने सन्मानित करण्यात आले. याशिवाय विविध ठिकाणी सेवा बजावताना त्यांनी अनेक पदके मिळवली.
लष्करातील सेवेनंतर त्यांनी खडपोली येथील जे. के. फाईल कंपनीमध्ये तब्बल 19 वर्षे सिक्युरिटी कम ड्रायव्हर म्हणून काम केले. कष्टाळू आणि प्रामाणिक स्वभावामुळे त्यांनी समाजात एक वेगळी ओळख निर्माण केली. कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत त्यांनी दोन मुलगे आणि दोन मुलींचे संगोपन केले. सर्व मुलांना योग्य मार्गदर्शन करून त्यांच्या विवाहांची जबाबदारीही पूर्ण केली.
अल्पशा आजारामुळे त्यांना दि. 24 एप्रिल 2026 रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान दि. 26 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजता डेरवण येथील वालावलकर रुग्णालयात त्यांचे निधन झाले. त्याच दिवशी सायंकाळी 5 वाजता त्यांच्या राहत्या घरातून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ, नातेवाईक आणि माजी सैनिक उपस्थित राहून त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. ‘यशसिद्धी माजी सैनिक संघ (रजि)’ या संस्थेचे ते संस्थापकीय खजिनदार होते. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून सैनिकी सलामी दिली. यानंतर कोलेखाजण स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, दोन मुली, नातवंडे असा मोठा परिवार आहे. बयाजी जाधव यांच्या निधनाने एक कर्तव्यदक्ष सैनिक, समाजाभिमुख कार्यकर्ते आणि कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.











