WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

बारावी निकाल ; कोकण विभाग राज्यात अव्वल


बारावी निकाल ; कोकण विभाग राज्यात अव्वल

यंदाही मुलींचीच सरशी

मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) बारावी (HSC) परीक्षेचा निकाल आज अधिकृतपणे जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल ८९.७९ टक्के लागला असून दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनीच उत्तुंग कामगिरी करत बाजी मारली आहे. विशेष म्हणजे कोकण विभागाने ९४.१४ टक्के निकालासह राज्यात अव्वल स्थान पटकावले आहे.

राज्य मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी आणि शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रतापसिंग यांनी पत्रकार परिषदेत निकाल जाहीर केला. दुपारी १ वाजल्यापासून विद्यार्थ्यांना अधिकृत संकेतस्थळावर निकाल पाहता येणार असून, वाढत्या ट्रॅफिकचा विचार करून १२ वाजल्यापासूनच निकाल उपलब्ध करून देण्यात आला.

🔹 मुलींचा दबदबा कायम
यंदा मुलींचा निकाल ९३.१५ टक्के लागला असून मुलांचा निकाल ८६.८० टक्के आहे. त्यामुळे मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत ६.३५ टक्क्यांनी अधिक आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही मुलींनीच उजवी बाजू राखली आहे.

🔹 विभागनिहाय कामगिरीत कोकण अव्वल
राज्यातील नऊ विभागांमधील निकालांमध्ये कोकण विभागाने सर्वाधिक ९४.१४ टक्के निकाल लावून आपला दबदबा कायम ठेवला. तर लातूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८४.१४ टक्के लागला.

विभागनिहाय निकाल टक्केवारी :
कोकण : ९४.१४% (अव्वल)
पुणे : ९१.२५%
मुंबई : ९०.०८%
अमरावती : ९०.९२%
नाशिक : ९०.७२%
कोल्हापूर : ८९.९७%
छत्रपती संभाजीनगर : ८८.६८%
नागपूर : ८८.६७%
लातूर : ८४.१४% (सर्वात कमी)

🔹 १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
पुणे, मुंबई, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागांतून १४ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यामध्ये अनेक विभागांनी समाधानकारक निकाल नोंदवला आहे.

🔹 शाखानिहाय निकाल
विज्ञान : ९६.४४%
वाणिज्य : ८७.०४%
व्यवसाय अभ्यासक्रम : ८२.७४%
आयटीआय : ८१.७८%
कला : ७८.०२%

🔹 २६ विषयांचा १००% निकाल
परीक्षेतील १५४ विषयांपैकी २६ विषयांचा निकाल शंभर टक्के लागला असून विद्यार्थ्यांची एकूण कामगिरी समाधानकारक असल्याचे मंडळाने सांगितले.

🔹 तणाव न घेण्याचे आवाहन
विद्यार्थी व पालकांनी निकालाबाबत कोणताही ताण न घेता शांतपणे निकाल स्वीकारावा, असे आवाहन मंडळाकडून करण्यात आले आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!