WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

शिरळ वाचनालयाच्या कार्याचा गौरव


शिरळ वाचनालयाच्या कार्याचा गौरव

श्री लक्ष्मी केशव देवस्थानात सन्मान सोहळा उत्साहात

चिपळूण : तालुक्यातील शिरळ-मालघर येथील श्री लक्ष्मी केशव देवस्थानात आयोजित श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यात शिरळ वाचनालयाच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला. या सांस्कृतिक कार्यक्रमात विविध क्षेत्रांत विशेष कामगिरी करणाऱ्या मान्यवर सदस्यांचा सत्कार करण्यात आला.

गेली २५ वर्षे ग्रामीण भागात वाचन संस्कृती रुजवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या शिरळ वाचनालयाचे संस्थापक व कार्यवाहक श्री गिरीधर साठे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. माजी लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ आणि अयोध्येतील प्रभू श्रीरामांची प्रतिमा देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी देवस्थानचे ज्येष्ठ कार्यकर्ते श्रीकांत उर्फ भाऊ बापट यांनी श्री. साठे यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याचा आढावा घेतला. वाचनालयाच्या माध्यमातून त्यांनी उभारलेल्या विविध उपक्रमांची तसेच मिळालेल्या पुरस्कारांची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.

समारंभात महाराष्ट्राचे ऍड. जनरल व ज्येष्ठ विधिज्ञ डॉ. मिलिंद साठे, हायकोर्ट न्यायाधीश मा. आरती साठे, उद्योजिका सौ. गोडबोले, तसेच न्यासाचे अध्यक्ष प्रकाश भालचंद्र साठे यांचाही सन्मान करण्यात आला. या मान्यवरांनी शिरळ वाचनालयाच्या कार्याचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी बोलताना सुमित्राताई महाजन यांनी वाचनालयाने राबविलेल्या ‘वाचन प्रचारक – वाचन दूत’ आणि ‘शिवालय शास्त्री’ यांसारख्या उपक्रमांचे विशेष कौतुक केले. ग्रामीण भागातील बालकांमध्ये वाचनाची आवड निर्माण करून त्यांना वक्तृत्व व कौशल्य विकासाची दिशा देण्याचे कार्य अत्यंत प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.

संस्थापक गिरीधर साठे यांनी आपल्या मनोगतात, वाचनालयाच्या कार्याची स्नेहपूर्वक दखल घेतल्याबद्दल मान्यवरांचे आभार मानले. या सन्मानामुळे वाचनालयाशी निगडित कार्यकर्त्यांना नवचैतन्य मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच या उपक्रमात कार्यरत असलेल्या वैदेही निकम, ग्रंथपाल सुप्रिया खोत, अनिल घडशी आदींचा उल्लेख करून त्यांच्या योगदानाचीही त्यांनी दखल घेतली.

कार्यक्रमाचा समारोप उत्साहात झाला असून, शिरळ वाचनालयाच्या कार्यामुळे ग्रामीण भागातील वाचन चळवळीला नवी दिशा मिळत असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!