WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

घाणेखुंट गवळवाडी अंगणवाडीचा संपला वनवास


घाणेखुंट गवळवाडी अंगणवाडीचा संपला वनवास

सँडविक कोरोमंटच्या कंपनीच्या सहकार्यातून उभारली हायटेक इमारत

सरपंच राजू ठसाळे यांचे योगदान

चिपळूण – खेड तालुक्यातील घाणेखुंट गवळवाडी येथील अंगणवाडीचा वनवास अखेर संपला आहे. १४ वर्षे भाड्याच्या जागेत अन पडवीत भरणाऱ्या अंगणवाडीला हक्काची इमारत मिळाली. झाडाफुलांची रंगरंगोटी, अंकगणिते अन विविध शैक्षणिक बाबींच्या रंगरंगोटीने चिमुकल्यांना निसर्गाच्या सानिध्यात बसल्याचा भास होतो. या जोडीलाच किचन, स्टोअररूम आणि विविध प्रकारची खेळणी उपलब्ध झाल्याने अंगणवाडीचा कायापालटच झाला आहे. वुल्फ्राम, सँडविक कोरोमंट व थिंक शार्प फाऊंडेशन च्या सीएसआर फंडातून जिल्ह्यात आदर्शवत अशी अद्ययावत इमारत उभारली आहे.

बालपणी मुलांना मुख्य प्राथमिक शिक्षण, आरोग्य व योग्य पोषण होणे आवश्यक असते. परंतु घाणेखुंट येथील गवळीवाडी अंगणवाडीत काहीशी वेगळी स्तिथी होती. गेली १४ वर्षे ही अंगणवाडी इमारती अभावी एका खासगी घराच्या पडवीत चालवली जात होती. अंगणवाडीला नविन इमारत मिळण्यासाठी ग्रामपंचायत तसेच गावाने अथक प्रयत्न केले तरी त्यास यश मिळाले नाही. याच दरम्यान वुल्फ्राम, सँडविक कोरोमंट कंपनीकडे संपर्क सादल्यानंतर त्यांनी चिमुकल्यांच्या अंगणवाडीस मदत करण्याचा निर्णय घेतला. सरपंच राजू ठसाळे यांनी याकामी पुढाकार घेत ग्रामस्थांना विश्वासात घेतले. सुरवातीला अंगणवाडीच्या छतावर पत्र्याची शेड नियोजीत होती. मात्र संबंधीत ठेकेदाराने नफा न कमावता त्याच निधीतून स्लॅबची इमारत उभारून दिली.

नविन देखण्या इमारतीत मुलांना स्वतंत्र खोली, चित्राद्वारे रंगवलेली संपूर्ण इमारत, किचन, स्टोअर रूम व खेळणी यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे या इमारतीच्या उद्घाटनासाठी ऑस्ट्रिया देशातून कंपनीच्या मॅन्युफॅक्चरिंग एक्सीक्युटिव्ह अँन्ग्रेट बिचेरल आल्या होत्या. याप्रसंगी डोल ताशाच्या गजरात मुलांना जुन्या अंगणवाडीतून नव्या अंगणवाडीत स्वागत करीत प्रवेश करण्यात आला. महिलांनी दखील शोभा यात्रेप्रमाणे पारंपारिक पोषाख परिधान करत मान्यवरांचे स्वागत केले. या इमारतीसाठी कुंदन तांबडे यांनी जागा उपलब्ध करून दिली. वुल्फ्राम, सँडविक कोरोमंट चे व्यवस्थापकीय संचालक पी. सुरेंद्रकुमार, शंकर के, सचिन पाटील, सतीश चव्हाण, शैलेंद्र ढवळे, रोशनी आचार्य व थिंक शार्प चे संतोष फड आदी मान्यवर उपस्थित होते. २०० हून अधिक ग्रामस्थांचा लोकसहभाग पाहून कंपनीचे अधिकारी देखील अचंबीत झाले. यापुढेही अंगणवाडीस सहकार्य करण्याची त्यांनी ग्वाही दिली. सरपंच राजू ठसाळे यांनी कंपनीच्या योगदानाबद्दल विशेष आभार मानले. यावेळी ग्रामस्थ, अंगणवाडी सेविका, मुलांच्या चेहऱ्यावर एक वेगळे समाधान दिसले. या कार्याबद्दल कंपनीचे सर्व थरांतून कौतुक होत आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!