श्री सुकाई रेफ्रिजरेशन दुकान फोडून साहित्याची चोरी
चिपळूण : तालुक्यातील सती नाका परिसरात असलेल्या एका रेफ्रिजरेशन दुकानात अज्ञात चोरट्यांनी धाड टाकत सुमारे १ लाख ४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप फरार आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना दि. ३ मे २०२६ रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते दि. ४ मे २०२६ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान घडली. या प्रकरणी फिर्यादी म्हणून प्रदीप काशिनाथ कदम (वय ४५, रा. वेहळे, कदमवाडी, ता. चिपळूण) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात इसमांविरोधात भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम ३३१(२), ३३१(४) व ३०५ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सती नाका येथील प्रदीप कदम यांच्या मालकीच्या “श्री सुकाई रेफ्रिजरेशन” या दुकानाची खिडकी तोडून अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला व विविध साहित्य चोरी करून नेले.
चोरीस गेलेल्या मुद्देमालामध्ये १७,०००/- रु. किंमतीचा काळ्या रंगाचा इमर्शियन कंपनीचा कॉन्प्रेसर, २५,०००/- रु. किंमतीची एक राखाडी रंगाची टुलकिट त्यामध्ये एसी, फ्रिज सर्व्हिसिंग करीता आवश्यक साहित्य,६,५००/- रु. किंमतीचा डीप-फ्रिजची सिल्व्हर कलरची क्वाईल, ६,०००/- रु. किंमतीचा इलेक्ट्रेस कंपनीचा हिरव्या रंगाचा ब्लोवर, किको कंपनीचा लाल व काळ्य रंगाचा सर्व्हिस पंप व काळ्या रंगाचा वॉशिंग पाईप, ५०००/- रु. किंमतीचा डीप-फ्रिजची सिल्व्हर कलरची कुलींग क्वाईल ७,०००/- रु. किंमतीचा काळ्या रंगाचा केपेटी कंपनीचा ड्रील मशीन, ३०,०००/- रु. किंमतीचे रेफ्रिजरेटचे तांब्याचे पाईपचे छोटे-छोटे तुकडे यांचा समावेश आहे.
घटनेची नोंद दि. ४ मे २०२६ रोजी सकाळी ११.३८ वाजता करण्यात आली आहे. या चोरीच्या घटनेमुळे सती नाका परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.











