WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

देशाच्या किनाऱ्यांवर सुरक्षा व एकतेचा संदेश


देशाच्या किनाऱ्यांवर सुरक्षा व एकतेचा संदेश

🔷 सीआयएसएफ ‘वंदे मातरम्’ कोस्टल सायक्लोथॉन–२०२६ ला नवी दिल्लीहून भव्य प्रारंभ
🔷 ६,५०० कि.मी.चा जनजागृती प्रवास
🔷 ‘सुरक्षित तट, समृद्ध भारत’चा नारा 

नवी दिल्ली : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) तर्फे आयोजित ‘वंदे मातरम्’ कोस्टल सायक्लोथॉन–२०२६ या राष्ट्रीय स्तरावरील जनजागृती व जनसंपर्क अभियानाचा शुभारंभ आज सकाळी ७.३० वाजता नवी दिल्लीतील मेजर ध्यानचंद राष्ट्रीय स्टेडियम येथून आभासी पद्धतीने करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्घाटन केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या हस्ते झाले.

ध्वजप्रदर्शनासह या २५ दिवसांच्या भव्य राष्ट्रीय मोहिमेला औपचारिक प्रारंभ झाला. या अंतर्गत सीआयएसएफच्या दोन सायकलिंग टीम्स एकाच वेळी पश्चिम बंगालमधील बक्कखाली आणि गुजरातमधील लखपत येथून मार्गस्थ झाल्या आहेत. या मोहिमेदरम्यान सुमारे ६,५०० किलोमीटरचा प्रवास भारताच्या पूर्व व पश्चिम किनारपट्टीवरून करण्यात येणार असून यात ९ किनारी राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. ही सायक्लोथॉन २२ फेब्रुवारी २०२६ रोजी कोची येथे समारोपास येणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती; आंतर-यंत्रणा सहकार्याचे दर्शन
ध्वजप्रदर्शन समारंभास विविध मंत्रालये व केंद्रीय सुरक्षा यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. यामध्ये डॉ. पल्लवी जैन गोविल (सचिव, युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय), श्री. शत्रुजीत कपूर (महानिदेशक, आयटीबीपी), श्री. प्रवीर रंजन (महानिदेशक, सीआयएसएफ), श्री. राकेश अग्रवाल (महानिदेशक, एनआयए), श्री. गौरव द्विवेदी (मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रसार भारती) आणि श्री. संजय सिंघल (महानिदेशक, एसएसबी) यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी सहभागी झाले होते. या मान्यवरांनी इंडिया गेट परिसरात आयोजित सायकल रॅलीमध्ये सहभाग घेऊन सायकलपटूंना पाठिंबा दिला. त्यांच्या उपस्थितीमुळे विविध मंत्रालये व यंत्रणांमधील सशक्त सहकार्याचे दर्शन घडले तसेच देशाच्या सुरक्षेबाबत एकजूट व राष्ट्रीय दृढनिश्चयाचा संदेश देण्यात आला.

‘वंदे मातरम्’च्या १५० वर्षांच्या निमित्त उपक्रम
कोस्टल सायक्लोथॉनच्या दुसऱ्या आवृत्तीच्या निमित्ताने मंत्र्यांनी सांगितले की, हा उपक्रम ‘वंदे मातरम्’ गीताच्या १५० वर्षांच्या निमित्त आयोजित करण्यात आला आहे. या गीताने भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला प्रेरणा दिली असून आजही राष्ट्रीय सेवेची भावना जागृत करत आहे.

किनारी सुरक्षा लोकसहभागातूनच बळकट : नित्यानंद राय
किनारी सुरक्षेबाबत बोलताना श्री. राय यांनी स्पष्ट केले की, किनारी सुरक्षा केवळ सुरक्षा यंत्रणांची जबाबदारी नसून सक्रिय लोकसहभागातूनच ती अधिक बळकट होऊ शकते, विशेषतः किनारी भागातील नागरिकांच्या सहभागातून. यावेळी त्यांनी नमूद केले की, आंतरराष्ट्रीय जहाज व बंदर सुविधा सुरक्षा (ISPS) कोड अंतर्गत सीआयएसएफला ‘मान्यताप्राप्त सुरक्षा संघटना (RSO)’ म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, ज्यामुळे भारताच्या सागरी व बंदर सुरक्षेमध्ये सीआयएसएफची मध्यवर्ती भूमिका अधोरेखित होते. हा उपक्रम माननीय पंतप्रधानांच्या ‘सागर – क्षेत्रातील सर्वांसाठी सुरक्षा व विकास’ या दृष्टीकोनाशी सुसंगत असून ‘सुरक्षित तट, समृद्ध भारत’ या संकल्पनेवर आधारित असल्याचे त्यांनी सांगितले.

देशभक्तीपूर्ण वातावरणात कार्यक्रम संपन्न
समारंभात ‘वंदे मातरम्’चे सामूहिक गायन तसेच सीआयएसएफ बँडच्या सादरीकरणामुळे संपूर्ण वातावरण देशभक्ती, अभिमान व उत्साहाने भारले गेले.

सीआयएसएफ महासंचालकांचे भाषण
सीआयएसएफचे महासंचालक यांनी आपल्या भाषणात सांगितले की, ही सायक्लोथॉन राष्ट्रीय एकता, त्याग व सामूहिक संकल्पनेचे प्रतीक आहे. नागरिकांचा सहभाग वाढवून देशाच्या सागरी सीमांचे संरक्षण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी नमूद केले.

उपक्रमाची प्रमुख उद्दिष्टे
सीआयएसएफ कोस्टल सायक्लोथॉन–२०२६ ची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे आहेत :
➡️अंमली पदार्थ, शस्त्रे व स्फोटके यांच्या तस्करीविरोधात किनारी समुदायांमध्ये जनजागृती
➡️किनारी समुदाय व सुरक्षा यंत्रणांमधील भागीदारी बळकट करणे
➡️स्वातंत्र्यसैनिक, शहीद व सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या त्यागाचा सन्मान
➡️भारताच्या सागरी परंपरा व किनारी समुदायांचे योगदान अधोरेखित करणे
➡️युवकांमध्ये आरोग्य, शिस्त व तंदुरुस्त जीवनशैलीचा प्रसार
➡️ या उपक्रमातून मच्छीमार समुदायांना देशाचे ‘तट प्रहरी’ म्हणून महत्त्वाची भूमिका बजावणारे घटक म्हणून अधोरेखित करण्यात आले आहे.

५२ किनारी गावे दत्तक; वर्षभर विकास उपक्रम
या सायक्लोथॉनदरम्यान ५२ किनारी गावांमध्ये थांबे असणार असून ही गावे सीआयएसएफकडून वर्षभरासाठी दत्तक घेतली जाणार आहेत. ओएनजीसी, बंदर प्राधिकरणे व अन्य सागरी संस्थांच्या सहकार्याने CSR अंतर्गत विविध सामाजिक व पायाभूत सुविधा विकास उपक्रम राबविले जाणार आहेत.भारताच्या किनारपट्टीजवळ कार्यरत असलेल्या ४७ सीआयएसएफ युनिट्स या गावांशी दीर्घकालीन संपर्क ठेवणार आहेत.

महिला सशक्तीकरणाचे पाऊल
या सायक्लोथॉनमध्ये ५० टक्के महिला सायकलपटूंचा सहभाग असून महिला सशक्तीकरण व लैंगिक समावेशकतेकडे टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल ठरत आहे.

नागरिकांना पाठिंब्याचे आवाहन
सीआयएसएफतर्फे माध्यम प्रतिनिधींना सहकार्याबद्दल आभार व्यक्त करण्यात आले असून नागरिकांनी www.cisf.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करून तसेच अधिकृत सोशल मीडिया हँडल्सद्वारे या मोहिमेला पाठिंबा द्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!