WhatsApp Image 2025-10-25 at 1.06.04 PM

कोकण स्टार्टअप चॅलेंज 2026 मध्ये गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसीच्या तीन प्रकल्पांची निवड


कोकण स्टार्टअप चॅलेंज 2026 मध्ये गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसीच्या तीन प्रकल्पांची निवड

सावर्डे : नवप्रबोधन इनक्युबेशन सेंटर (एनआरआयएफ) आणि सीआयआरईई – स्टार्टअप आणि इनक्युबेशन सर्व्हिसेस यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कोकण स्टार्टअप चॅलेंज 2026 मध्ये गोविंदराव निकम कॉलेज ऑफ फार्मसी, सावर्डे येथील तीन नाविन्यपूर्ण प्रकल्पांची निवड करण्यात आली आहे. या निवडीमुळे कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी आणि मार्गदर्शक प्राध्यापकांनी संशोधन व स्टार्टअप क्षेत्रात मोठी कामगिरी साध्य केली आहे.

महाराष्ट्रभरातील उत्कृष्ट स्टार्टअप कल्पनांना ओळखून त्यांना पुढील टप्प्यावर नेण्यासाठी या स्पर्धेची रचना करण्यात आली होती. निवड झालेल्या प्रकल्पांना इनक्युबेशन समर्थन, तज्ज्ञ मार्गदर्शन, बाजारपेठ प्रवेशासाठी सहकार्य तसेच सरकारी निधी मिळविण्याबाबत योग्य दिशा दिली जाणार आहे. या चॅलेंजमध्ये पाच स्टार्टअप्सना “बेस्ट इमर्जिंग स्टार्टअप” हा किताब देऊन पुढील इनक्युबेशनची संधी प्रदान करण्यात आली.

ड्युअल सीझन स्मार्ट हॅटचा अभिनव प्रयोग
गोविंदराव निकम कॉलेजच्या निवड झालेल्या तीन प्रकल्पांपैकी पहिला प्रकल्प प्रा. डॉ. ललिता नेमाडे आणि प्रा. प्रणली दळवी यांनी सादर केलेला “ड्युअल सीझन स्मार्ट हॅट” हा आहे. ही हॅट अत्यंत उष्ण तसेच अत्यंत थंड हवामानात शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे हायपोथर्मिया व उष्माघातामुळे होणारे मृत्यू टाळण्यास मदत होऊ शकते. या हॅटमध्ये वापरण्यात येणारे हॉट पॅक आणि कोल्ड पॅक दैनंदिन दुखापतींमध्येही उपयोगी ठरू शकतात. विशेष म्हणजे ही हॅट विजेचा वापर न करता, वारंवार वापरता येणारी आणि परवडणाऱ्या किमतीत बाजारात उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

अझोलाट्रिनिटी प्रकल्पातून कुक्कुटपालनाला चालना
दुसरा निवड झालेला प्रकल्प “अझोलाट्रिनिटी” हा विद्यार्थ्यांनी प्रा. अपेक्षा रहाटे-साळवी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला. अझोला या शेवाळीपासून कुक्कुटपालन व्यवसायासाठी पौष्टिक खाद्य तयार करणे तसेच डास प्रतिबंधक म्हणून त्याचा वापर होऊ शकतो, असा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. ग्रामीण भागातील शाश्वत शेतीपूरक व्यवसायाला या कल्पनेमुळे चालना मिळू शकते.

फायटोप्लास्टमधून शाश्वत बायोप्लास्टिक निर्मिती
तिसरा प्रकल्प “फायटोप्लास्ट” हा शेतीच्या कचऱ्याचा वापर करून पर्यावरणपूरक बायोप्लास्टिक तयार करण्यावर आधारित आहे. विद्यार्थ्यांनी प्रा. सुकन्या पाटील आणि प्रा. आदित्य गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प विकसित केला असून प्लास्टिक प्रदूषण कमी करण्यासाठी हा महत्त्वाचा पर्याय ठरू शकतो.

संस्थेकडून अभिनंदनाचा वर्षाव
या उल्लेखनीय यशाबद्दल सहभागी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांचे संस्थेचे पदाधिकारी, कॉलेजचे प्राचार्य तसेच वरिष्ठ शिक्षकांकडून कौतुक करण्यात येत आहे. भविष्यात या प्रकल्पांना व्यावसायिक स्वरूप देऊन बाजारात आणण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण संधी उपलब्ध होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.


610
कृपया वोट करा
 न्यूज हाऊसच्या बातम्याबद्दल मत व्यक्त करा
error: Content is protected !!