दलवाई हायस्कूल येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात
चिपळूण : मिरजोळी पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित दलवाई हायस्कूल, मिरजोळी येथे गुरुवार दि. 19 फेब्रुवारी 2026 रोजी छत्रपती शिवाजी महाराज जयंती संपन्न झाली. या दिनाचे औचित्य साधून प्रशालेमध्ये “शिवगीत गायन” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेचे मुख्याध्यापक रोहित जाधव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर इयत्ता पाचवी ते सातवी (लहान गट) व इयत्ता आठवी नववी (मोठा गट) अशा दोन गटांमध्ये शिवगीत गायन स्पर्धा घेण्यात आली. इयत्ता सातवी अ मधील कुमारी पवित्रा सन्नाक या विद्यार्थिनीने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कुमार मिहीर भुवड या विद्यार्थ्याने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी मनोगत व्यक्त केले. त्यानंतर गीत गायन स्पर्धा घेण्यात आली. सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट अशी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित गीतांचे सादरीकरण केले. तसेच या दिनाचे औचित्य साधून शालेय वार्षिक क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम शाळेतील ज्येष्ठ शिक्षक मोहन पवार यांच्या मार्गदर्शन नुसार संपन्न झाला.
मुख्याध्यापक रोहित जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या. तसेच विद्यार्थ्यांनी शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये चांगल्या गुणांची जोपासना करावी असा संदेश दिला. ऐतिहासिक वास्तूंचे महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी त्या वास्तूंच्या जतनासाठी व संवर्धनासाठी तसेच तो परिसर कचरामुक्त राहावा यासाठी प्रयत्न करावेत तर खऱ्या अर्थाने शिवाजी महाराज जयंती साजरी केल्याचे सार्थक होईल असे मौलिक विचार मांडले. त्यानंतर शाळेतील सहाय्यक शिक्षक ऋषिकेश भागवत यांनी गीत गायन स्पर्धेतील विजेत्या स्पर्धक गटांची नावे जाहीर केली. त्यांना सर्व शिक्षक वृंदांमार्फत बक्षीसांचे वितरण करण्यात आले. शेवटी ऋषिकेश भागवत यांनी आभार सर्वांचे आभार मानले.











