‘प्रमोद जठार माझे जुने मित्र; त्यांच्या सहानुभूतीबद्दल धन्यवाद : आमदार भास्करराव जाधव
विरोधी पक्षनेतेपद सरकार आणि विधानसभा अध्यक्षांच्या हातात असल्याचेही केले स्पष्ट
चिपळूण : भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रमोद जठार यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आमदार भास्कर जाधव यांना भाजपमध्ये येण्याची खुली ऑफर दिल्यानंतर त्यावर आमदार भास्कर जाधव यांनीही मिश्किलपणे आपली प्रतिक्रिया दिली. ‘प्रमोद जठार माझे जुने मित्र असल्याचे सांगत त्यांच्या सहानुभूतीबद्दल धन्यवाद मानले.
प्रमोद जठार यांनी बुधवारी चिपळूण येथे बोलताना, “शिवसेना उबाठामध्ये भास्कर जाधव यांना त्यांच्या क्षमतेप्रमाणे काम दिले जात नाही. ते नाराज आहेत. कोकणाला भास्कर जाधव यांच्यासारख्या नेत्याची गरज आहे. त्यांनी योग्य विचार करावा. भारतीय जनता पक्षात त्यांचे स्वागत आहे,” असे म्हणत त्यांना भाजपमध्ये येण्याचे खुले निमंत्रण दिले होते.
या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना आमदार भास्कर जाधव म्हणाले, “प्रमोद जठार हे माझे खूप जुने मित्र आहेत. आम्ही पाच वर्षे एकत्र विधिमंडळात काम केले आहे. त्याचप्रमाणे आज ज्या पक्षातील काही नेत्यांसोबत ते आहेत, त्या नेत्यांच्या विरोधात आम्ही दोघांनी नगरपालिकेत एकत्र काम केलेले आहे. त्या काळात सिंधुदुर्गातील भाजपचे प्रमुख नेते प्रमोद जठारच होते.”
ते पुढे म्हणाले, “प्रमोद जठार यांना माझी काम करण्याची पद्धत पूर्णपणे माहिती आहे. मी एकदा एखाद्याला शब्द दिला की, तो शब्द पाळण्यासाठी कोणतेही संकट अंगावर घेण्याची माझी तयारी असते. त्यामुळे आदरापोटी त्यांनी माझ्याबद्दल जे काही वक्तव्य केले असेल. माझ्याबद्दल त्यांना एवढी सहानुभूती आहे, याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो.”
दरम्यान, विरोधी पक्षनेतेपदाबाबत सुरू असलेल्या चर्चेवरही भास्कर जाधव यांनी भाष्य केले. ते म्हणाले, “विरोधी पक्षनेता म्हणून नाव जाहीर करण्याची जबाबदारी सरकारची आणि विधानसभा अध्यक्षांची आहे. सरकारने प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांकडे पाठवायचा असतो आणि त्यानंतर अध्यक्ष त्याची घोषणा करतात. त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद जाहीर करणे ही माझ्या पक्षप्रमुखांची जबाबदारी नाही.”
यावेळी त्यांनी प्रमोद जठार यांना आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल पुन्हा शुभेच्छा दिल्या. “मी त्यांचे अभिनंदन केले आहे. मित्र म्हणून जर त्यांनी माझ्यासाठी पुढाकार घेतला आणि त्यांच्या मुख्यमंत्री तसेच विधानसभा अध्यक्षांकडे विरोधी पक्षनेतेपदाबाबत पाठपुरावा केला, तर आम्हाला आनंदच होईल. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानेन. मात्र हा निर्णय उद्धव ठाकरे यांच्या हातात नसून मुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्ष यांच्या अधिकारात आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपकडून आलेल्या खुल्या ऑफरला थेट नकार किंवा स्वीकार न देता, आपल्या शब्दाला आणि राजकीय बांधिलकीला प्राधान्य असल्याचे भास्कर जाधव यांनी आपल्या प्रतिक्रियेतून स्पष्ट केले. त्याचबरोबर विरोधी पक्षनेतेपदाबाबत सुरू असलेल्या राजकीय चर्चेवरही त्यांनी घटनात्मक प्रक्रिया अधोरेखित करत आपली भूमिका मांडली.












