चिपळुणातील खड्ड्यांवरून ठाकरे सेना आणि भाजपच्या नगरसेवकामध्ये खडाजंगी
चिपळूण नगरपरिषद सभा, गोवळकोट शाळा व मैदान आरक्षण उठवणे कामास स्थगिती
चिपळूण, ता. २३ ः शहरातील खड्ड्यांवरून ठाकरे सेना आणि भाजप नगरसेवकांमध्ये जोरदार खडाजंगी झाली. एकमेकांना हातवारे करून इशारे अन खुन्नस देण्यात आली. शेवटी नगराध्यक्षांनी पुढाकार घेत दोघांना शांत केले. विकासकामे करण्यासाठी लोकांनी तुम्हाला निवडून दिले आहे, भांडणासाठी नव्हे याची जाणीव नगराध्यक्षांनी करून दिल्यानंतर भडकलेला वाद शमला.
शहरातील इंदिरा गांधी सांस्कृतिक केंद्रात नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्या अध्यक्षतेखाली पालिकेची जनरल सभा झाली. या सभेत शहरात चर्चेचा विषय ठरलेल्या आणि स्थानिक ग्रामस्थांनी प्रतिष्ठेचा बनवलेल्या गोवळकोट येथील शाळा व खेळाचे मैदान आरक्षण उठवणे कामास अखेर स्थगिती देण्यात आली. तर उक्ताड येथील वाहनतळ आरक्षण उठवण्यास सभागृहाने मंजुरी दिली. तर शहराच्या मध्यभागी बियर शॉपीला परवानगी देण्याचा ठराव देखील सभागृहाने फेटाळला व यासंदर्भात मुख्याधिकाऱ्यांना सर्व अधिकार दिले. विषय पत्रिकेवर तब्बल ५४ विषय असल्याने व त्यातील काही विषय हे थेट सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले होते. प्रामुख्याने शहरातील गोवळकोट येथील शाळा व मैदानाचे आरक्षण उठण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याला येथील नागरिकांचा कडाडून विरोध आहे. हा विषय शहरात बहुचर्चित बनला होता.त्यामुळे सभागृह कोणता निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. याविषयी काँग्रेस नगरसेवक साजिद सरगुरोह व सफा गोठे यांनी शाळा व मैदानाचे आरक्षण उठवण्यास जोरदार विरोध केला. फक्त विरोधच नव्हे तर चार ते पाच कोटी निधी उपलब्ध करून नगराध्यक्षांनी येथे प्राथमिक शाळा इमारत आम्हाला बांधून द्यावी आणि खेळाचे मैदान देखील विकसित करून घ्यावे अशी मागणी करत नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांचीच कोंडी करण्याचा प्रयत्न केला. परंतु नगराध्यक्षांनी देखील तितक्याच शिताफीने हा विषय प्रशासनाकडे ढकलून वस्तुस्थिती सभागृहासमोर आणली. प्रत्यक्षात राज्याच्या नगरविकास विभागाकडून सदरचे आरक्षण उठवण्यासदर्भात पत्र आले असून त्या अनुषंगाने वृत्तपत्रात नोटीस तसेच सभागृहात हा विषय लावण्यात आला असा खुलासा मुख्याधिकारी संजय जाधव यांनी केला, परंतु काँग्रेस व उबाठा सदस्यांनी आपला विरोध कायम ठेवला. अखेर नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी या विषयाला स्थगिती देत असल्याचे सभागृहात जाहीर केले. संपूर्ण माहिती आणि मार्गदर्शन घेतल्यानंतर या विषयावर चर्चा केली जाईल असेही अध्यक्षांनी यावेळी नमूद केले त्यामुळे सद्या तरी या विषयावर पडदा पडला आहे.
शहरातील उक्ताड येथील अटळ बिहारी वाजपेयी वाहनतळ जागेचे आरक्षण उठवून ती जागा अन्य कामासाठी वापरण्यासाठीचा ठराव सभागृहाने एकमुखाने मंजूर केला.मात्र ही जागा कोणत्या कामासाठी उपयोगात आणावी यावरून वेगवेगळी मते नगरसेवकांनी सभागृहात मांडली. आरक्षण उठवल्यानंतर त्या बाबत सभासगृहात चर्चा करून निर्णय घेऊ असे अध्यक्षांनी नमूद यावेळी नमूद केले. त्यामुळे उकताड येथील वाहन तळाची जागा आता मोकळी होणार आहे.
शहरातील बाजारपेठेत असलेल्या एका बिल्डिंगमध्ये बियर शॉपीसाठी नाहरकत देण्याचा विषय समोर येताच ज्येष्ठ नगरसेवक फैसल कासकर यांनी त्वरित आक्षेप घेत हा विषय प्रशासनाचा आहे.तो सभागृहासमोर का आला?आमचा या विषयाशी संबंध नाही.असे विषय सभागृहात येताच कामा नये,असे स्पष्ट करत प्रशासनाकडे बोट दाखवले, तर साजिद सरगुरोह यांनी यावेळी मुख्याधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्ती केली. राष्ट्रवादीच्या नगरसेविका नसरीन खडस यांनी देखील या विषयाला कडाडून विरोध केला.अखेर हा विषय फेटाळण्यात आला व मुख्याधिकाऱ्यांना अधिकार देण्यात आले.
शहरातील रस्त्यावर पडलेल्या प्रचंड खड्ड्यांचा विषय सभागृहात चर्चेला येताच भाजप नगरसेवक शशिकांत मोदी यांनी मार्कंडी ते काविळतळी दरम्यान पडलेल्या खड्ड्यांचा उल्लेख करून येथील सुवर्ण भास्कर पेट्रोल पंपाचा थेट उल्लेख केल्याने शिवसेना उबाठा गट नेते विकी नरळकर यांनी जोरदार आक्षेप घेतला, तर शशिकांत मोदी यांनी देखील त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यामुळे भाजप आणि उबाठा नगरसेवकामध्ये चांगलीच बाचाबाची झाली. अखेर नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी हस्तक्षेप करून दोन्ही गटांना योग्य ती समज दिली. बालहक्क संरक्षण समिती गठीत करण्यावरून पुन्हा महाविकास आघाडी व महायुतीमध्ये मतभेद दिसून आले. अखेर भाजपच्या अंजली कदम यांची या समितीच्या अध्यक्षपदी तर राष्ट्रवादीच्या नसरीन खडस यांची सदस्यपदी निवड करण्यात आली. अध्यक्ष उमेश सकपाळ यांच्यासह सर्व नगरसेवक तसेच प्रशासनाने पुष्कगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले तसेच मागासवर्गीय समितीच्या सभापती म्हणून नीलिमा जाधव यांची निवड करण्यात आली.











