गवा रेड्यांच्या कळपाचा धुडगूस
🔺रामपूर कुंभारवाडीत भातशेतीचे मोठे नुकसान
🔺सिताराम टेरवकर यांची लावणी केलेली भातशेती उध्वस्त
🔺वन विभागाने तातडीने उपाययोजना करण्याची शेतकऱ्यांची मागणी
रामपूर : रामपूर परिसरात गेल्या काही दिवसांपासून गवा रेड्यांच्या कळपाचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुमारे २० ते २२ गवा रेड्यांच्या कळपाने परिसरातील विविध शेतांमध्ये धुडगूस घालत पिकांचे मोठे नुकसान केल्याची घटना घडली आहे.
रामपूर परिसरातील अलाटीवाडी, कुंभारवाडी, बैकरवाडी, गावणंगवाडी, तांबी तसेच गुढे फाटा या भागात गवा रेड्यांचा कळप सातत्याने फिरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या कळपाने कुंभारवाडी येथील शेतकरी सिताराम टेरवकर यांच्या लावणी केलेल्या भातशेतीत प्रवेश करून मोठ्या प्रमाणात पिकाची नासधूस केली. नुकतीच लागवड करण्यात आलेली भातशेती अक्षरशः उध्वस्त झाल्याने टेरवकर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
शेतकऱ्यांनी सांगितले की, गवा रेड्यांच्या वाढत्या वावरामुळे दिवसा आणि रात्री शेतात जाणेही धोकादायक बनले आहे. त्यामुळे शेतमालाचे संरक्षण करणे कठीण झाले असून, वन्यप्राण्यांच्या हल्ल्याची भीती कायम आहे. यामुळे परिसरातील शेतकरी चिंतेत असून पिकांचे आणखी नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर वन विभागाने तातडीने घटनास्थळी पाहणी करून गवा रेड्यांच्या कळपाचा योग्य बंदोबस्त करावा, पिकांच्या नुकसानीचा पंचनामा करून बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी रामपूर परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.











